सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या प्रा. सुशीला लक्ष्मण आबुटे तर राष्ट्रवादीचे प्रवीण डोंगरे यांची उपमहापौरपदी बहुमताने निवड झाली. या निवडीमुळे काँग्रेस व राष्ट्रवादीने समाधानाचा सुस्कारा सोडत जल्लोष केला.
महापालिकेच्या ३५ व्या महापौरपदाची निवडणूक शनिवारी पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहिले. महापौरपदासाठी काँग्रेसच्या प्रा. आबुटे यांना ६२ तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या नरसूबाऊ गदवालकर यांना ३२ मते मिळाली. प्रा. आबुटे यांना अधिक ३० मते मिळाल्यामुळे त्यांची निवड जाहीर करण्यात आली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही मतांच्या फरकात बदल झाला नाही. राष्ट्रवादीचे प्रवीण डोंगरे यांना ६२ तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या अनिता चव्हाण यांना ३२ मते मिळाली. बसपा व माकपच्या प्रत्येकी तीन नगरसेवकांनी मतदानात भाग न घेता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले माजी महापौर महेश कोठे व शिवसेनेचे मनोज शेजवाल हे दोघे पालिका सभागृहात गैरहजर होते. तर रिपाइंचे रवी गायकवाड यांनी महायुतीचा धर्म सोडून काँग्रेसच्या बाजूने मतदान केले. प्रा. आबुटे व डोंगरे यांची निवड होताच सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गोटात समाधानाचा सुस्कारा सोडण्यात येऊन मोठा जल्लोष करण्यात आला.
गेल्या २५ वर्षांपासून महापालिकेत कोठे गटाचे वर्चस्व होते. त्यांच्या गटाचे १५ नगरसेवक आहेत. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत सत्तांतर होऊन महायुतीचा महापौर होणार की काय, याविषयी राजकीय क्षेत्रात उत्सुकता वाढली होती. त्यातूनच कोणतीही जोखीम न पत्करता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आपल्या पक्षाच्या सर्व ४४ नगरसेवकांना व्हिप बजावला होता. इतकेच नव्हे तर पक्षाचा एकही नगरसेवक विरोधकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून सर्व नगरसेवकांना हैदराबाद येथे हलविण्यात आले होते. मात्र या सहलीकडे पाठ फिरवून २२ नगरसेवकांनी सोलापुरातच राहणे पसंत केल्यामुळे महापौर निवडणुकीचा निकाल कसा लागणार, याची धाकधूक कायम होती. सभागृहात निवडणूक मतदानाची प्रक्रिया होत असताना कोठे गटाच्या हालचालींकडे सर्वाचे लक्ष वेधले होते. परंतु या गटाच्या एकाही नगरसेवकाने विरोधात भूमिका न घेता काँग्रेसच्याच बाजूने मतदान केले. नूतन महापौर प्रा. सुशीला आबुटे (६१) नवबौध्द समाजाच्या असून त्या काँग्रेसमध्ये ३५ वर्षांपासून सक्रिय आहेत. त्या व्हॉलिबॉलच्या राष्ट्रीय खेळाडू होत्या. नूतन उपमहापौर प्रवीण डोंगरे (४७) हे अभियंता आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा