सोलापूर शहर भाजपच्या अध्यक्षपदावरून पालकमंत्री विजय देशमुख हे मुक्त झाले असून त्यांचे उत्तराधिकारी म्हणून प्रा. अशोक निंबर्गी यांची वर्णी लागली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी मुंबईत शहराध्यक्षपदाची घोषणा केली. प्रा. निंबर्गी हे पालकमंत्री देशमुख यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.
पालकमंत्री विजय देशमुख हे गेल्या पाच वर्षांपासून शहराध्यक्षपदाची धुरा वाहत होते. तीन वेळा आमदारकी सांभाळताना देशमुख यांना पक्षांतर्गत गटबाजी सहन करावी लागत होती. एकीकडे पक्षांतर्गत विरोधक वाढले असताना दुसरीकडे देशमुख यांची राजकीय चढती कमान वाढतच गेली. गेल्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची संधी दिली गेली. त्यामुळे विरोधक थंड झाले खरे; परंतु गटबाजी शांत झाली नाही. शहरात भाजपमध्ये विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख व खासदार शरद बनसोडे असे तीन गट आहेत. या पाश्र्वभूमीवर विजय देशमुख हे राज्यमंत्री झाल्यानंतर शहराध्यक्षपद दुसऱ्याला मिळणार, हे अपेक्षित होते. त्यानुसार प्रा. अशोक निंबर्गी यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली. प्रा. निंबर्गी हे पालकमंत्री देशमुख यांचे विश्वासू सहकारी समजले जातात. देशमुख यांच्या शिफारशीनेच त्यांची वर्णी लागल्याचे बोलले जाते.
निंबर्गी हे संगमेश्वर महाविद्यालयात प्राध्यापक असून ते कोळी समाजाचे आहेत. मागील २५ वर्षांपासून ते भाजपमध्ये सक्रिय आहेत. अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग आहे. ते सध्या भाजपचे स्वीकृत नगरसेवक आहेत. त्यांच्या पत्नी जयश्री निंबर्गी यांनी यापूर्वी नगरसेवकपदाची जबाबदारी सांभाळली होती. संघटन कौशल्याच्या बळावर त्यांची पक्षात प्रगतिपथावर वाटचाल सुरू असल्याचे मानले जाते.
सोलापूर शहर भाजपच्या अध्यक्षपदी प्रा. अशोक निंबर्गी
सोलापूर शहर भाजपच्या अध्यक्षपदावरून पालकमंत्री विजय देशमुख हे मुक्त झाले असून त्यांचे उत्तराधिकारी म्हणून प्रा. अशोक निंबर्गी यांची वर्णी लागली आहे.

First published on: 12-06-2015 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prof ashok nimbargi elected for president of solapur city bjp