अहिल्यानगर : पिठासीन अधिकाऱ्यांनी एखाद्या विषयावर स्वतःचे प्रतिकूल मत असले तरी पीठासीन अधिकारी म्हणून मर्यादा पाळल्या पाहिजे, असे मत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या ‘मर्सिडीज’ भाष्य प्रकरणावर व्यक्त केले. दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्हा विभाजन होणार नसल्याचे भाष्य केले होते. त्यावर बोलताना सभापती शिंदे म्हणाले, ते त्यांचे मत असू शकेल, मात्र जिल्हा विभाजनाचा सभागृहात विषय उपस्थित झाला तर त्या चर्चेला कशी कलाटणी देता येईल हे जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी पाहील, असे भाष्यही त्यांनी केले.
विधान परिषदेचे सभापती झाल्यानंतर प्रथमच राम शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपचे प्रदेश पदाधिकारी प्रा. भानूदास बेरड, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर सरचिटणीस सचिन पारखी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा. शिंदे यांनी मी विधान परिषदेचा सभापती असल्याने व ते पद संवैधानिक असल्याने मत व्यक्त करण्यावर मर्यादा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मढी ग्रामस्थ मुस्लिम व्यावसायिक बंदी ठराव, अहिल्यानगरचा बिहार झाल्याच्या खासदार नीलेश लंके यांच्या आरोपावर मत व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला.
येत्या ३ मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभापती म्हणून प्रत्यक्ष कामाचा अनुभव मी घेणार आहे, असे स्पष्ट करून आमदारांच्या अपात्रता प्रकरणी सुनावणी झाली आहे व त्यांना वेळ वाढवून दिला आहे, असे त्यांनी सांगितले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मवर्ष सोहळा ३१ मे रोजी होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. या पार्श्वभूमीवर चोंडी येथे मंत्रिमंडळ बैठक घ्यावी व चौंडी गाव राष्ट्रीय स्मारक जाहीर करून त्या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा तिथे व्हाव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीसाठी त्यांनी तत्वतः मान्यता दिली आहे व राष्ट्रीय स्मारक करण्याच्या दृष्टीने चोंडी विकासाचा बृहत आराखडा तयार करून बैठक घेण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला केल्याचे सभापती शिंदे यांनी सांगितले.
रोहित पवारांनी आव्हान स्वीकारलेच नाही
कर्जत-जामखेड मतदारसंघात माझा पराभव झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी ईव्हीएम व अन्य मुद्द्यांवर मोर्चा काढला. त्यावेळी मी त्यांना आव्हान दिले होते की मी पण आमदार आहे व तुम्ही पण आमदार आहात, आपण दोघेही राजीनामा देऊ व पुन्हा लढू असे त्यांना जाहीर सांगितले होते. परंतु त्यावर त्यांनी उत्तरच दिले नाही. नंतर ईव्हीएम मोर्चासारखे त्यांचे प्रकारही बंद झाले, अशी टिप्पणी करून सभापती शिंदे म्हणाले, अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अतिशय चांगली झाली परंतु रोहित पवारांनी विद्रोही संमेलना सारखी नवी विद्रोही कुस्ती स्पर्धा जाहीर केले आहे, परंतु ज्यांनी निवडणुकीत नुरा कुस्ती केली, त्यांनी खऱ्या कुस्ती स्पर्धेची भाषा करू नये अशी टिपणीही शिंदे यांनी केली.