नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरातील प्राणिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रो. एस. पी. चव्हाण यांची भारताच्या ३९ व्या अंटाक्र्टिका (दक्षिण ध्रुव) मोहिमेसाठी निवड  झाली आहे. भारतातून प्रतिवर्षी दक्षिण ध्रुवावरील वातावरण, पर्यावरण, जैवसृष्टी, भूगर्भ विज्ञान, अवकाश विज्ञान इत्यादी विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय ध्रुवीय व सामुद्रिक संशोधन संस्था, गोवा येथून येत्या नोव्हेंबर महिन्यात ही मोहीम निघणार आहे.

या मोहिमेसाठी निवडल्या गेलेल्या यावर्षीच्या दहा शास्त्रज्ञांच्या टीममध्ये विविध राष्ट्रीय संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञ आहेत. त्यापैकी प्रा. चव्हाण हे महाराष्ट्रातील विद्यापीठातून एकमेव शास्त्रज्ञ आहेत. साधारणत: उणे नऊ अंश सेल्सियस ते उणे २५ अंश सेल्सियस अशा अतिथंड वातावरणात ‘ध्रुवीय पक्ष्यांच्या प्रजनन व अन्नसाखळी तसेच पक्ष्यांचे अ‍ॅडाप्टेशन टू कोल्ड’ या विषयावर प्रा. चव्हाण संशोधन करणार आहेत.

जगातील गोडय़ा पाण्याच्या जवळपास ९०-९२ टक्के पाणीसाठा बर्फाच्या स्वरुपात दक्षिण ध्रुवावर आहे. तसेच हा भाग अनेक दुर्मीळ खनिजांनी व्यापलेला आहे. अंटाक्र्टिका खंड  जगातील कुणालाही संशोधनासाठी उपलब्ध आहे. पण या भागावर कोणाचाही मालकी हक्क नाही. जगातील काही प्रमुख देशांचे या ध्रुवावर संशोधन केंद्र आहेत. भारताच्या ‘मत्री’ आणि ‘भारती’ या संशोधन केंद्रावर भारतीय शास्त्रज्ञ संशोधन करत असतात. सहा महिने दिवस व सहा महिने रात्र (हिवाळा) अशा वेगळ्या वातावरणात अतिशय खडतर पर्यावरणीय स्थितीत येथे संशोधन चालते. प्रो. चव्हाण हे चार महिन्यांसाठी ‘मत्री’ या भारतीय संशोधन केंद्रावर संशोधन करतील.

अवकाश संशोधन मोहिमेखालोखाल ‘अंटाक्र्टिका मोहीम’ खडतर मोहीम मानली जाते. या मोहिमेचे आयोजन आणि खर्च भारत सरकारचे पृथ्वी विज्ञान मंत्रालय करते.