खासगी महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापिकेचा विनयभंग करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी येथील विशेष अतिरिक्त सत्र न्यायालयाने प्राध्यापकास पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. खासगी महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापिकेचा विनयभंग करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी येथील विशेष अतिरिक्त सत्र न्यायालयाने प्राध्यापकास पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
बीड येथील विशेष अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी.एन.खडसे यांनी गुरुवार दि. ४ मार्च रोजी खासगी महाविद्यालयातील प्राध्यापकास पाच वर्ष सश्रम कारावास व आठ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. शहरातील एका खासगी महाविद्यालयातील प्राध्यापकाने दि. १४ नोव्हेंबर २०१७ रोजी तेथीलच सहयोगी प्राध्यापिकेच्या मोबाइलवर अश्लिल चित्रफितीची लिंक पाठवून तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले होते. या प्रकरणात महाविद्यालय प्रशासनाने प्राध्यापक गजानन करपे (वय ४१, स्वराज्यनगर बीड) यास निलंबित केले होते. त्यानंतर करपे यांनी दि. १४ फेब्रुवारी २०१८ रोजी पिडितेस रस्त्यात अडवून जातीवाचक शिवीगाळ करत विनयभंग केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पिडीतेच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विनयभंगासह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम व माहिती तंत्रज्ञान अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी पूर्ण करुन आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. गुरुवारी विशेष अतिरिक्त सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याच्या आधारे गजानन करपे यास दोषी ठरवून पाच वर्ष सश्रम कारावास व आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.