शिक्षकपदासाठी आवश्यक असलेल्या डी.टी.एड. (आता डी.ईएल.एड.) अभ्यासक्रमपूर्ण करणाऱ्यांना नोकरीची हमी नसल्याने या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांंनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. परिणामत राज्यातील असंख्य डी.टी.एड. कॉलेजेस बंद पडल्याने त्याचा सर्वाधिक फटका या महाविद्यालयात डी.टीएड.घडवणाऱ्या प्राध्यापकांची दुरवस्था झाली आहे, तर डी.टी.एड. होऊन शिक्षकाची नोकरी मिळवून मजेत असल्याचे मजेदार पण विचित्र चित्र राज्यभर दिसत आहे.
काही वर्षांपूर्वी नोकरीची शंभर टक्के हमी असलेल्या डी.एड. (नंतर डी.टी.एड आता डी.ईएल.एड.) अर्थात, डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन अभ्यासक्रमाचे अक्षरश पेव फुटले आणि विनाअनुदान तत्वावर राज्यभर अशा महाविद्यालयांची खिरापत सरकारने वाटली. परिणामत डी.टी.एड.धारक ७ लाख उमेदवार नोकरीच्या शोधात भटकत आहेत, पण त्यांना घडवणारे अशा महाविद्यालयांमधील एम.ए., एम फील., एम.एड. झालेले आणि काही तर पीएच.डी झालेले शेकडो प्राध्यापक बेकार होऊन अक्षरक्ष हलाखीचे जीवन जगत आहेत. आता नोकरी गेल्याने बेकार होऊन हेच काय फळ मम तपाला, असे म्हणण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. यावर्षी डी.टी.एड. आता डी.ईएल.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज दाखल करण्याची शेवटीची तारीख १५ जून असून विद्यार्थ्यांंचा या अभ्यासक्रमाकडे अजिबात कल नाही. खुद्द जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अर्थात, ‘डायट’कडेच विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. खासगी डी.टी.एड. महाविद्यालये तर आधीच ओस पडली आहे. एवढे मात्र खरे की, पूर्वी बारावीची परीक्षा सर्वोत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर नोकरीची हमखास शाश्वती देणाऱ्या या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचे लोंढेच्या लोंढे येत असत. आता सारे चित्र बदलले आहे. डी.टी.एड. महाविद्यालये बंद पडल्याने डी.टी.एड.घडवणारे उच्चविद्याविभूषित प्राध्यापक बेकारीच्या खाईत गटांगळ्या खात आहेत. तरीही आरटीई अर्थात, शिक्षण हक्क कायद्यामुळे डी.ईएल.एड. धारकांची आवश्यकता भविष्यात मोठय़ा प्रमाणात निर्माण होणार आहे, असा आशवाद शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. आणि हा आशावादच शेकडो बेकार प्राध्यापकांना बुडत्याला काठीचा आधार वाटत आहे. आज मात्र त्यांना कदान्न आणि त्यांनी घडवलेल्यांना पक्वान्न, असे चित्र आहे. आरटीईनुसार शिक्षणरचनेत बदल करणे ही एक राज्य सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे, पण लवकरच तोडगा निघेल, असे शिक्षण विभाग सांगत आहे.
कोणता अभ्यासक्रम नोकरीची हमी देतो?
डी.ईल.एड.अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी असलेल्या आवेदनपत्रावर ‘राज्यात २ मे २०१० नंतर शिक्षक भरती परीक्षा (सी.ई.टी) झालेली नाही, तसेच २०१३ मधील शिक्षक पात्रता परीक्षेस (टी.ई.टी.) ५ लाख ९१ हजार ९९० आणि २०१४ च्या टी.ई.टी.ला ३ लाख ८८ हजार विद्यार्थी बसले होते, ही वस्तुस्थिती पाहता डी.ईल.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थीना नोकरी मिळेलच, याची खात्री नाही’ असे स्पष्टपणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने छापले आहे. परिषदेच्या या इशाऱ्यावर असा कोणता अभ्यासक्रम आहे जो पूर्ण केल्याने नोकरीची सरकार हमी देते, असा उलट सवाल काही शिक्षणतज्ज्ञांनी विचारला आहे.  सरकारला हे ठाऊक आहे की, आधीच ७ लाख डी.टी.एड.धारक बेकार आहेत. त्यात आणखी भर पडून ‘आ बल मुझे मार’ नको म्हणून आधीच खबरदारी घेतलेली बरी.

Story img Loader