महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्रावर संकटं घेऊन आली असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये व्यक्त केलं आहे. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महराष्ट्रामध्ये अधिक प्रगती झाल्याने परराज्यातील लोकं महाराष्ट्रामध्ये येऊ लागल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्याचे राज यांनी म्हटलं आहे. यावेळेस त्यांनी उत्तर प्रदेशचे उदाहरण देत ज्या राज्यामध्ये आतापर्यंतच्या पाचहून अधिक पंतप्रधानांचे मतदारसंघ राहिले आहेत त्या राज्यामधून लोकं काम शोधायला बाहेर पडत असतील तर यासंदर्भात राज्यकर्त्यांनी विचार करायला हवा असं मत राज यांनी व्यक्त केलं आहे.

इतक्या पंतप्रधानांचे मतदारसंघ आलेल्या उत्तर प्रदेशचा विकास का होत नाही?

महाराष्ट्र  दिनानिमित्त राज यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. यामध्ये राज यांनी अगदी करोनाचे संकट, महाराष्ट्राच्या निर्मितीपासून वाढत गेलेल्या अडचणी, परप्रांतीय, राज्य सरकारचे काम अशा अनेक विषयांवर भाष्य केलं. एका प्रश्नाला उत्तर देताना राज यांनी “बाकीच्या राज्ये प्रगती न करता तिकडचे लोकं उठून इथे येत असतील तर महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्रावर संकटं घेऊन आली असं म्हणावं लागेल,” असं मत व्यक्त केलं. आपल्या मताचा ऐतिहासिक दाखला देताना त्यांनी काही दशकांपूर्वी दाक्षिणत्य लोकं महाराष्ट्रात यायची. पण तिकडे प्रगती झाली आणि लोकं यायची बंद झाली असं सांगितलं.  “आधी दाक्षिणात्य लोकं महाराष्ट्रात यायची. हळूहळू दक्षिण भारत प्रगत झाला ती माणसं यायची बंद झाली. त्यामुळे राज्यांची प्रगती होणे हाच यावर उपाय आहे. आपण उत्तर प्रदेश घेतला तर आजपर्यंत जेवढे पंतप्रधान झाले आहेत त्यापैकी पंडित जवाहरलाल नेहरु, लाल बाहदुर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, व्हि.पी. सिंग, अटल बिहारी वाजपेयी अगदी आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही मतदारसंघ ज्या उत्तर प्रदेश राज्यात आहे त्या राज्यातून एवढी लोकं नोकऱ्यांच्या शोधात इतर राज्यांच जात आहेत. त्या राज्याची प्रगती होत नाहीय. तर अस का होतयं हे पाहणं आपल्या राज्यकर्त्यांची जबाबदारी नाही का?”, असा सवाल राज यांनी उपस्थित केला आहे.

राज्यकर्ते कणाहीन झालेत…

राज यांनी अन्य एका प्रशाला उत्तर देताना एखाद्या राज्यातील राज्यकर्तेच तेथील समाजाला आदर्श घालून देऊन शकतात असं मत व्यक्त केलं. “राज्यकर्ते हे कणाहीन झालेत सगळे. आपलं काय आहे आपलं बलस्थान काय आहे याचा त्यांना विसर पडत आहे. १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक झाला तेव्हापासून ते १८१८ पर्यंत महाराष्ट्राने सर्व भूभागावर वर्चस्व गाजवलं आहे. एवढं जुनं कशाला अगदी आताआतापर्यंतचं बोलायचं झालं तर बाळासाहेब असती किंवा इतर मोठे नेते असतील त्यांनी कधी महाराष्ट्राची मान झुकवली नाही, वाकवली नाही. दिल्ली ऐकायची महाराष्ट्राचं, साधु संतांची परंपरा, शिवरायांच बंड अशा अनेक गोष्टी महाराष्ट्राने दिल्यात देशाला,” असं मत राज यांनी व्यक्त केलं.

ठिकयं रे चालायचं स्वभाव महागात पडतोय

“इतर राज्येही हळूहळू मोठी झाली आहेत. महाराष्ट्राकडे पाहूनच ती मोठी झालीयत. पण महाराष्ट्राचे वेगळेपण, सांस्कृतीक जडणघडण महाराष्ट्र विसरलाय. आपला ‘ठिकयं रे चालायचं’ स्वभाव आपल्याला महागात पडतो. साधं मराठी अशुद्ध बोललं तरी आपण तुला अर्थ समजला ना असं म्हणून सोडून देतो. हे असं नाही चालणार. हे चालायचं स्वभावामुळे आपण आपला बाणा विसरलो आहोत,” अशा शब्दांमध्ये राज यांनी आपल्या मनातील खंत  बोलून दाखवली.

राज्यकर्त्यांनी आदर्श घालून देण्याची गरज

महाराष्ट्राचं सध्याचं चित्र भांबावलेलं दिसत असल्याचंही राज म्हणाले. “आमचे अनिल शिदोरो महाष्ट्राचं होकायंत्र बिघडलयं असं म्हणतात तेच मला म्हणावसं वाटतयं. देशाला दिशा देणारा महाराष्ट्रच आज चाचपडतोय. राज्यकर्ते हतबल असतील आणि तेच गुडघे टेकत असतील तर समाजाने पहायचं कोणाकडे? सामान्य माणसं सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे पाहत असतो आणि तिथूनच ती घेतो. मी मागे पश्चिम बंगालमध्ये गेलो होतो. ती जी लोकं मला भेटली, भेटायला आली ती एकमेकांशी बंगालीमध्ये बोलत होती. तिथले प्रतिष्ठित व्यक्ती, लेखक त्यांच्याच भाषेत एकमेकांशी बोलत होते. हे असं करुन ते लोकांना आदर्श घालून देत होते. राज्यकर्त्यांनाही असंच वागणं अपेक्षित आहे,” असं मत राज यांनी व्यक्त केलं.

Story img Loader