ज्या उद्देशाने सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्या उद्देशासाठी जर त्या वापरल्या जात नसतील तर सरकारने त्या परत घेतल्या पाहिजेत, अशी मागणी रविवारी येथे करण्यात आली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा संघर्ष न्यायालयीन पातळीवर चालू आहेच. यापुढे प्रकल्पग्रस्तांनी रस्त्यावरच्या संघर्षांतही उतरले पाहिजे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप यांनी केले.
येथील शेतकरी संघटना पुरस्कृत प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने शेती वाचवा, शेतकरी वाचवा, देश वाचवा हा महामेळावा घेण्यात आला. या महामेळाव्यास चटप यांच्यासह गुणवंत पाटील हंगरगेकर, ब. ल. तामसकर, गोविंद जोशी, अॅड. प्रकाश पाटील, अॅड. अनंत उमरीकर, किशोर ढगे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात ज्या उद्देशासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, त्या उद्देशाला पुढे हरताळ फासला गेला. आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे शेकडो एकर जमीन असूनही ही जमीन पडीक अवस्थेत आहे. यातून विद्यापीठाला कोणताही लाभ नाही. अशा वेळी जर जमिनी हस्तगत करण्याचा उद्देश साध्य झाला नसेल तर या जमिनी सरकारने परत घेतल्या पाहिजेत, असे या मेळाव्यात ठरले. प्रकल्पग्रस्तांची कायदेशीर लढाई चालू असताना आता प्रकल्पग्रस्तांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार केला पाहिजे, असे या वेळी सांगण्यात आले. या मेळाव्यास शेंद्रा, बलसा, सायळा, रायपूर या प्रकल्पग्रस्त गावातील शेतकरी मोठय़ा संख्येने हजर होते. शेतकरी संघटनेचे दिवंगत कार्यकर्ते पुरुषोत्तम लाहोटी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
‘प्रकल्पग्रस्तांनी रस्त्यावरच्या संघर्षांत उतरावे’
ज्या उद्देशाने सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्या उद्देशासाठी जर त्या वापरल्या जात नसतील तर सरकारने त्या परत घेतल्या पाहिजेत, अशी मागणी रविवारी येथे करण्यात आली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा संघर्ष न्यायालयीन पातळीवर चालू आहेच.
First published on: 28-07-2014 at 01:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Project affected fight on road