जगातून नामशेष होत असलेले व महाराष्ट्राच्या काही भागात आढळणारे माळढोक पक्षी आणि गडचिरोलीच्या काही भागात शिल्लक राहिलेल्या रानम्हशी यांच्या संवर्धनासाठी वन विभागाकडून विशेष योजना हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार या वन्यजीवांचे संरक्षित वातावरणात प्रजनन करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.
वन्यजीवांच्या या दोन्ही प्रजाती अतिशय दुर्मिळ समजल्या जातात. माळढोक हे देशात मोजक्याच राज्यांमध्ये आढळतात. महाराष्ट्रात तर अलीकडे केवळ १५ माळढोक पक्ष्यांची नोंद झाली. गडचिरोलीतील एका भागात वैशिष्टय़पूर्ण रानम्हशी आढळतात. त्यासुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
वेगवेगळ्या कारणांमुळे या प्रजाती संपत चालल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी आता वेगळे प्रयत्न हाती घेण्याची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून या प्रजातींचे ‘इक्स सीटू कंझर्वेशन’ केले जाणार आहे. त्याअंतर्गत त्यांचे संरक्षित वातावरणात प्रजनन केले जाईल. पुढे या प्रजाती निसर्गात सोडल्या जातील. राज्यात हे प्रयोग पहिल्यांदाच केले जाणार आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Story img Loader