कोटय़वधी रुपये खर्चून सेवाग्रामात उभारण्यात येणारा, गांधी फॉर टुमारो, हा प्रकल्प विचारांसोबतच संस्कृतीचेही दर्शन घडविणारा असावा म्हणून ‘गांधी जीवनदर्शन’ ध्वनीप्रकाशाच्या चित्रपटलातून सादर करण्याची सूचना पुढे आली आहे.
सेवाग्राम आश्रमला ७५ वर्ष पूर्ण झाल्याने औचित्य साधून राज्य शासनाने ‘गांधी फॉर टुमारो’ या प्रकल्पास मंजूरी दिली आहे. जागतिक स्तरावर नेल्सन मंडेला, अब्राहम लिंकन यांच्या विचारावर आधारित संदेशप्रकल्प तयार झाले आहे. त्याच धर्तीवर हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा राहणार आहे. प्रकल्पासाठी दहा एकर जागा अधिग्रहित करण्याचे काम १ कोटी २१ लाख रुपये प्राप्त झाल्यानंतर सुरू झाले असून कन्व्हेंशन सेंटरसाठी ९५ कोटी मंजूर झाले आहे. पर्यटक व अभ्यासकांसाठी याअंतर्गत २७ स्थळांची निवड करण्यात आली असून ‘हेरिटेज वॉक’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. अडारकर असोसिटसकडे हे काम सोपविण्यात आले असून कंपनीच्या श्रीमती नीरा अडारकर यांनी नुकतेच प्रकल्पाचे सादरीकरण केले.
सेवाग्रामला अशा प्रकारचा प्रकल्प अस्तित्वात यावा म्हणून गत दोन वर्षांपासून पाठपुरावा करणारे जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी शासनाकडे याअनुषंगाने एक महत्वपूर्ण सूचना केली आहे. प्रकल्पासोबतच गांधी विचारांवर आधारित थीम पार्कची निर्मिती व्हावी. तसेच यामधे सत्याग्रही व स्वातंत्र्यसेनानी यांनी आंदोलनात दिलेल्या विविध सहभागांच्या शिल्पकृती असाव्या. रात्री आणि दिवसाही त्या प्रकाशमान ठरतील, अशी ध्वनिप्रकाश योजना ठेवावी. लाईट अ‍ॅन्ड फोऊंटन शो सह ही बाग फु लविण्यात येवून त्याठिकाणी किमान अडीच हजार लोकांची बसण्याची सोय व्हावी. आंतरराष्ट्रीय दर्जाचे सभागृह झाल्यासच विदेशी पर्यटकांचा ओघ वाहू शकतो. देशभरात अशी स्थळं त्यांच्या ध्वनीप्रकाश योजनेनेच लक्षावधी प्रेक्षकांना खेचत आहेत. अहमदाबादच्या अक्षरधाम मंदिरात लाईट, फोयर व साउंड फोंउटनच्या माध्यमातून भारतीय संस्कृती उलगडण्यात आली आहे. खजुराहो येथेही असा शो होतो. अमिताभ बच्चनच्या आवाजातून त्याठिकाणी ध्वनीमुद्रित निवेदन केले जाते. अंदमान निकोबारला वीर सावरकरची अमरगाथा प्रसिध्द नट ओमपुरी यांच्या आवाजातून ऐकायला मिळते. सिंगापूरलाही लाईटशोच्या माध्यमातून नृत्य, संगीत व इतिहासाची प्रस्तुती होत असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. महात्माजींनी जगाला अद्वितीय विचारधन दिले. महात्माजींचे सात सिंध्दात प्रसिध्द आहेत. या सिध्दांताचा संदेश देणाऱ्या कलाकृती सादर होणे अपेक्षित आहे. १८५७ ते १९४७ दरम्यानचा भारतीय स्वातंत्र्यलढा चित्रित झाल्यास जगाला नेहमीसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल. १९८० मधे वर्धा हा गांधी जिल्हा म्हणून देशभरात एक आदर्श जिल्हा करण्यासाठी राज्यशासनाने २०० कोटी रूपयाचा एक आराखडा तयार केला होता. पण तो कागदावरच राहल्याचे स्मरण करून देत शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी नव्या प्रकल्पाचे स्वरूप केवळ दर्शनी नसावे, अशी अपेक्षा अग्निहोत्री यांनी व्यक्त केली. याठिकाणी नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्याच्या हेतूने ग्रामीण अर्थकारणास पूरक असे संशोधनकार्य चालावे. जलस्तर वाढण्याहेतूने वाहणाऱ्या नाल्यातील पाणीसाठयाचे रक्षण, शेतजमिनीस पाणीपुरवठा, जैवतंत्रज्ञान, कृषीतंत्रज्ञान अशा आधुनिक विज्ञानाचा स्पर्श करणाऱ्या विषयाची त्यास जोड असावी. डोळयास सुखावह, बुध्दीस चालना व स्थानिकांना उपयुक्त असे पैलू प्रकल्पाकडून अपेक्षित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा