नगर शहरातील जागा काँग्रेसकडे असली व पक्षाबरोबरची आघाडी संपुष्टात आल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नसले तरी राष्ट्रवादीचे महापौर संग्राम जगताप यांनी शुक्रवारी सकाळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. राष्ट्रवादीकडे शहरातून सात जणांनी उमेदवारी मागितली आहे.
राष्ट्रवादीने यापूर्वी आपल्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ राज्य पातळीवरील नेत्यांच्या उपस्थितीत केला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी खा. सुप्रिया सुळे उपस्थित होत्या त्याप्रमाणे आजच्या शुभारंभास नेते किंवा पदाधिकारी, पक्षनिरीक्षक अंकुश काकडे आदी कोणी उपस्थित नव्हते. केवळ जगताप समर्थकच उपस्थित होते, याकडे लक्ष वेधले जात आहे. जगताप समर्थकांकडून मात्र दोन दिवसांपूर्वी पक्षाचे नेते शरद पवार व अजित पवार यांनी प्रचार सुरू करण्यास सांगितल्याचा दावा करत ही बंडखोरी नाही, असे आवर्जून सांगितले जाते. मात्र या घटनेने आघाडी कायम राहिली तरी आपली उमेदवारी कायम असेल, असेच जगताप यांनी सूचित केले. या वेळी जगताप यांनी शक्तिप्रदर्शनही केले.
माळीवाडा विशाल गणेश मंदिरात नारळ फोडून व आरती करून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. या वेळी परिसरातून प्रचारफेरीही काढण्यात आली. आ. अरुण जगताप, माजी आमदार दादा कळमकर, अॅड. लक्ष्मण वाडेकर, अविनाश घुले, दीपक सुळ तसेच नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
‘अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा’
राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्या प्रचार शुभारंभाबद्दल काँग्रेसच्या उमेदवारीचे प्रमुख दावेदार सत्यजित तांबे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘आपण अधिकृत निर्णयाची वाट पाहात आहोत’ अशी मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रवादीतीलच आणखी एक प्रमुख दावेदार व युवक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही ‘नो कॉमेंट्स’ असे उत्तर दिले.

Story img Loader