सार्वजनिक बांधकाम विभागात टक्केवारीचे प्रस्थ कसे रुजले आहे, याची प्रचिती लाच घेताना पकडलेल्या येथील कार्यकारी अभियंता व शाखा अभियंता यांच्याकडे सापडलेल्या सुमारे तीन कोटींच्या रोख रकमेसह कोटय़वधींच्या स्थावर मालमत्तेवरून
येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पकडल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि ते जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले. परिणामी, त्यांना अटकही करणे अशक्य झाले. या दोघा संशयितांकडे राज्यभरात खरेदी केलेल्या कोटय़वधींच्या मालमत्तेची इतकी कागदपत्रे सापडली की, त्यांची छाननी करण्यास बराच कालावधी लागणार आहे.
ठेकेदाराचे बील मंजूर करण्यासाठी २२ हजार रूपयांची लाच स्वीकारताना येथील सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग कार्यालयातील कार्यकारी अभियंता सतीश मधुकर चिखलीकर व शाखा अभियंता जगदीश वाघ यांना मंगळवारी रंगेहात पकडण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागातील देवघेवीविषयी फारशी तक्रार होत नसल्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अनुभव आहे. या संदर्भात तक्रार आल्यानंतर झालेल्या कारवाईमुळे बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. चिखलीकर याच्या बंगल्याची झडती घेतानाच तब्बल दोन कोटी ९६ लाख रुपये रोख मिळून आले. सोने-चांदीच्या दागिन्यांचे मोजमोप करण्याचे काम बुधवारी सकाळपर्यंत सुरू होते. संबंधितांकडे मालमत्तेची इतकी कागदपत्रे सापडली की, खास मोटारीद्वारे ती न्यावी लागली. नांदेड जिल्ह्यातील चिखली येथील मूळ रहिवासी असलेला चिखलीकरने ज्या ज्या भागात बदली झाली, त्या सर्व म्हणजे बीड, परभणी, लातूर, नाशिक आदी ठिकाणी लाखो रूपयांच्या मालमत्ता खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. जगदिश वाघ याच्या घराच्या झडतीत ३५ हजार रुपये रोख व ११ तोळे सोन्याचे दागिने, मालमत्तेची कागदपत्रे मिळाली. त्यानुसार कॉलेजरोड या उच्चभ्र परिसरात त्यांनी दोन हजार चौरस फूटाच्या दोन अलिशान घरांची नुकतीच खरेदी केल्याचे उघड झाले आहे. या एका घराची किंमत एक कोटीहून अधिक असल्याचा अंदाज आहे. त्याच्या तिजोरीत दोन लाख १३ हजार रूपयांची रोकड आढळून आल्याची माहिती या विभागाचे पोलीस उपअधीक्षक शालीग्राम पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. त्यांच्या दोन लॉकरची तपासणी होणे अद्याप बाकी आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना संशयितांना पकडल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि ते मंगळवारी रात्रीच ते जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले. परिणामी, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला त्यांना अटकही करता आली नाही. संपूर्ण राज्यातील रस्त्यांची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी असणाऱ्या सार्वजनिक पाटबंधारे विभागातील कारभार कशा थाटणीने चालतो, त्याची प्रचिती या दोन अभियंत्यांकडील डोळे दिपवून टाकणाऱ्या मालमत्तेवरून सहजपणे येऊ शकते.
लाचखोर अभियंत्यांच्या मालमत्तेची मोजदाद दुसऱ्या दिवशीही सुरूच
सार्वजनिक बांधकाम विभागात टक्केवारीचे प्रस्थ कसे रुजले आहे, याची प्रचिती लाच घेताना पकडलेल्या येथील कार्यकारी अभियंता व शाखा अभियंता यांच्याकडे सापडलेल्या सुमारे तीन कोटींच्या रोख रकमेसह कोटय़वधींच्या स्थावर मालमत्तेवरून येत आहे.
First published on: 02-05-2013 at 05:13 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Property counting continued on second day also of currupt engineer