महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि सोलापूरसहीत देशभरातील अनेक ठिकाणी आज नमाज पठणानंतर भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याविरोधात मुस्लिम समजाने मोर्चे काढले तसेच निदर्शने केली. औरंगाबादमध्येही काढलेल्या मोर्चात एमआयएमचे स्थानिक खासदार इम्तियाज जलील सुद्धा सहभागी झाले होते. या ठिकाणी मोर्चानंतर त्यांनी नुपूर शर्मा यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केलीय.

नक्की वाचा >> प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: राज्यात अनेक ठिकाणी मुस्लिमांचा मोर्चा; गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, “नूपूर शर्मा यांच्या वादग्रस्त…”

औरंगाबादमध्ये नमाज पठणानंतर मोठ्याप्रमाणात मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळालं. यावेळी इम्तियाज जलील यांनी देखील या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला. नंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना जलील यांनी आम्ही काही दिवस वाट पाहिली मात्र कोणतीही कारवाई सरकारकडून करण्यात आली नाही. म्हणून सरकारवर कारवाईसाठी दबाव निर्माण करण्याच्या हेतूने आम्ही सारे जमले होतो, असं सांगितलं. यावेळेस जलील यांनी नुपूर शर्मांच्या अटकेची मागणी केली. काहीवेळाने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना उत्तर देताना जलील यांनी थेट नुपूर यांना फाशी देण्याची मागणी केली.

प्रशासन कारवाई करत नाही
“अनेकांना छोट्या छोट्या गुन्ह्यांसाठी तुरुंगामध्ये टाकलं जातं. मग शर्मा आणि (नवीन) जिंदाल यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही?”, असा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला. नुपूर शर्मा यांच्यासोबत भाजपाचे प्रवक्ते नवीन जिंदाल यांच्यावरही भाजपाने निलंबनाची कारवाई केलीय. “प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान करण्यात आल्याने सर्व मुस्लिमांच्या भावना दुखावल्या आहेत. आम्ही अनेक दिवस वाट पाहिले. जे लोक धर्म, जात यासारख्या मुद्द्यावरुन शांतता भंग करतात अशा लोकांवर पोलीस आणि प्रशासन काहीच कारवाई करत नाही,” अशा शब्दांमध्ये जलील यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

“नुपूर शर्माला फाशी द्या”
आंदोलनासंदर्भात बोलताना जलील यांनी, “ज्या ज्या ठिकाणी आंदोलन होत आहे त्या ठिकाणी शांतता राखावी,” असं आवाहन केलं. पुढे नुपूर शर्मा यांच्याबद्दल बोलताना जलील यांनी भाजपाच्या निलंबित प्रवक्त्यांना फाशी देण्याची मागणी केली. “नुपूर शर्माला फाशी दिली पाहिजे. कोणत्याही धर्माविरोधात कोणी बोलत असेल तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे,” असंही जलील म्हणाले.

सोलापुरात एमआयएमचं शक्तीप्रदर्शन…
महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि सोलापूरात देखील मुस्लीम समुदायाने एकत्र येत निदर्शने केली. औरंगाबादमधील विभागीय कार्यालयासमोर मुस्लीम बांधव हजारोंच्या संख्येनं जमल्याच पहायला मिळालं. येथे त्यांनी भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विधानाचा निषेध करत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सोलापुरात देखील एमआयएम पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाच्या माध्यमातून एमआयएमचे शक्तिप्रदर्शनही पाहायला मिळालं.

देशभरात आंदोलने…
दिल्लीतील जामा मशिदीबाहेर आज (१० जून) नमाज पठणानंतर मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले आणि त्यांनी नपूर शर्मांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी हातात पोस्टर्स घेत नुपूर शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील केली. दिल्लीनंतर मुस्लीम समुदायाच्या आंदोलनाची धग देशभरातील अनेक शहरापर्यंत पोहोचली आहे. लखनऊ, कानपूर आणि फिरोजाबाद सारख्या शहरांत देखील मुस्लीम समुदायाकडून मोर्चे काढले आहेत. यानंतर पोलिसांनी संबंधित शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.