गोदावरी कालवे शंभर वर्षांचे झाले, मात्र त्यांचे काम अजूनही रखडलेलेच आहे. आगामी तीन वर्षांत दुरुस्तीसाठी ३५१ कोटी ८९ लाख १७ हजार रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत ४५५ कोटी १४ लाख ४ हजार रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. १९८३ साली या कालव्यांचे नूतनीकरण सुरू झाले, आत्तापर्यंत फक्त ४० टक्केच काम झाले आहे.
येत्या आर्थिक वर्षांत १३० कोटी, १४-१५ मध्ये १०१ कोटी ८९ लाख, तर १५-१६ मध्ये १२० कोटी असे एकूण ३५१ कोटी ८९ लाख रुपये या कालव्यांच्या कामासाठी लागणार आहेत. मात्र राज्य सरकार फक्त १५ ते २० कोटी रुपये देते, त्यात हे काम अजूनही २५ वर्षे रखडण्याची चिन्हे आहेत.
नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नर, निफाड, येवला अहमदनगर जिल्ह्य़ांतील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर आणि औरंगाबाद जिल्ह्य़ातील वैजापूर या तालुक्यातील एकूण ३३ हजार १७० हेक्टर क्षेत्राला या कालव्यांतून पाणी मिळते. दारणा धरणापासून नांदूर मध्यमेश्वर उंचवणीचा बंधारा ७५ किलोमीटर आहे. त्यापासून गोदावरी उजवा कालवा ११० किलोमीटर, डावा कालवा ९० किलोमीटर लांबीचा असून १९११ ते १९१६ या कालखंडात ब्रिटिशांनी हे कालवे बांधले. स्वातंत्र्योत्तर काळात १९९४ मध्ये २१ कोटी ५८ लाखांच्या मूळ प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यात पुढे वाढ होऊन हा खर्च आता ४५५ कोटींवर गेला आहे. मागच्या बारा वर्षांत या कालव्यांचे ६५ टक्के मातीकाम पूर्ण झाले. नाबार्डकडून २००२ मध्ये त्यासाठी ३० कोटी ५८ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर झाले, प्रत्यक्षात निधी २००५ मध्ये उपलब्ध झाला. नाबार्ड-७ ही योजना डिसेंबर २००७ मध्ये बंद झाली. नाबार्डअंतर्गत या कालव्यांवर फक्त १२ कोटी ५७ लाख रुपये खर्च झाले आहेत. सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार या कालव्यांच्या ३६४ बांधकामांपैकी १८७ बांधकामांची दुरुस्ती प्रस्तावित करण्यात आली आहे. सन २००२ मध्ये या कालव्यांच्या मोऱ्या पडण्याचे प्रकार प्रचंड वाढले, त्याचा परिणाम शेती आवर्तनांवर होऊन शेतीचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. सन २००९ मध्ये या कालव्यांच्या कामांसाठी ३६७ कोटी १३ लाख २१ हजार रुपयांचा प्रस्ताव सरकारच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला. यातील शेरेबाजीची पूर्तता होण्यासाठी या प्रस्तावाचा प्रवास नाशिक ते गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ ते शासन दरम्यान दोन वर्षांचा कालखंड लागला. गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यांच्या प्रस्तावात मातीकाम, १२ जलसेतू, १३ कमानमोऱ्या, ३५ रस्तापूल, वितरिका व चाऱ्या त्यावरील विमोचक यांचा समावेश आहे. या ३६४ पैकी फक्त ६४ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित २९९ कामे कधी मार्गी लागतील हे येणारा काळच ठरविणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा