नगर शहरातील उड्डाणपुलासाठी केंद्र सरकारने केंद्रीय मार्ग निधीतून (सीआरएफ) स्वतंत्रपणे तरतूद करावी, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली. नगर-पुणे रेल्वे कॉड लाइनचा व दौंड-मनमाड दुहेरीकरणाचा, नगर-परळी मार्गासाठीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डकडे मंजुरीसाठी सादर झाला आहे, त्यामुळे यंदा यासाठी तरतूद अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
आगामी रेल्वे व केंद्रीय अर्थसंकल्पात निधी व मंजुरीसाठी प्रस्तावित केलेल्या प्रस्तावांची माहिती खा. गांधी यांनी आज, सोमवारी पत्रकारांना दिली. शहरातील भुईकोट किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी जिल्हाधिकारी व स्थानिक संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांची मागील आठवडय़ात बैठक झाली, त्यानुसार संरक्षण विभाग व राज्य सरकार यांच्यामध्ये करारनामा करून (एमओयू) हा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवल्याची माहिती त्यांनी दिली.
पिंपळगाव माळवी येथील तलावाचे सुशोभीकरण करून तेथे पावसाळय़ापूर्वी नौकानयन व इतर कामे सुरू करण्याचा प्रस्ताव वन खात्याकडे दिला आहे, तसेच त्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यास महापालिकेला सांगितले आहे. दौड ते मनमाड रेल्वे मार्गावरील नगर, श्रीरामपूर, कोपरगावसह विविध रेल्वेस्थानके खासगीकरणातून सुशोभित करण्याचा प्रस्ताव सादर केल्याचे गांधी यांनी सांगितले.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून यंदा २१ रस्ते मंजूर झाले आहेत. या योजनेचा इतर राज्यांचा अखर्चित निधी या रस्त्यांना मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. बेलवंडी (श्रीगोंदे) येथील रेल्वेवरील उड्डाणपुलासाठीचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे.
(चौकट१)
‘व्यक्तिगत स्वार्थासाठी शहर वेठीला’
नगर शहरात नवे काही होऊ देण्यापेक्षा न होऊ देण्याकडेच अनेकांचा कल आहे, त्यांची संख्याही अधिक आहे. वृत्तपत्रही त्यांना अधिक प्रसिद्धी देतात, असा आक्षेप खा. गांधी यांनी घेतला. या वृत्तीमुळेच नगर शहरात काही चांगले उभे राहू शकत नाही, त्याचे परिणामही नगरकरांना भोगावे लागत आहेत. व्यक्तिगत स्वार्थासाठी काही जण शहराला वेठीला धरत आहेत असाही आरोप त्यांनी केला.
(चौकट२)
‘फेज टू’ची चौकशी करा
शहरातील फेज टू पाणी योजनेच्या चौकशीची तसेच दिलेल्या निधीचे लेखापरीक्षण करा, अशी मागणीच आपण केंद्र सरकारकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. योजनेचे पाइप कोठेही बसवले गेले आहेत, त्यात ताळमेळ नाही, असा आक्षेप त्यांनी घेतला.
नगरच्या उड्डाणपुलासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव
नगर शहरातील उड्डाणपुलासाठी केंद्र सरकारने केंद्रीय मार्ग निधीतून (सीआरएफ) स्वतंत्रपणे तरतूद करावी, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली.
First published on: 24-02-2015 at 03:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Proposal to government for nagar flyover