सोलापूर : यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून पाचशे किलोमीटर दूर अंतरावर धाराशिवमार्गे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आलेला वाघ शुक्रवारी पुन्हा धाराशिव जिल्ह्यात परत गेल्याचे दिसून आले. दरम्यान, या वाघाला जेरबंद करून रेडिओ कॉलर करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडवण्यासाठी सोलापूरच्या वन विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
स्वतःचा अधिवास शोधण्यासाठी टिपेश्वर अभयारण्यातून आलेला हा वाघ गेल्या शनिवारपासून बार्शी तालुक्यात वास्तव्यास होता. वाघावर नजर ठेवण्यासाठी वन विभागाने विविध ठिकाणी सापळा कॅमेरे लावले आहेत. या परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचाही वावर असल्यामुळे त्यात प्रथमच वाघाची भर पडल्यामुळे बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी, घोळवेवाडी, चिंचोळी, पांढरी, कारी, नारी आदी १४ गावांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सुरुवातीला येडशी, रामलिंग अभयारण्य परिसरातील गावांच्या शिवारात आढळून आलेला वाघ नंतर नागरी वस्ती असलेल्या कारी, नारी भागातही गावकऱ्यांच्या नजरेस पडला. गेल्या सात-आठ दिवसांत वाघाने काही जनावरांवर हल्ले करून शिकार केली होती. नागरी वस्त्यांच्या भागात आल्यामुळे मानवाला धोका निर्माण झाला आहे. जर जनावरांची शिकार सापडली नाही तर वाघ मानवी वस्त्यांमध्ये हल्ला करू शकतो.
हेही वाचा >>>सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात प्रथम; दररोज सरासरी ८४४ शेतकऱ्यांना लाभ
या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या वन विभागाने या वाघाला जेरबंद करून आणि त्यास रेडिओ कॉलर करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासनाला पाठविला आहे. उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक यांनी याबाबतची माहिती दिली. हा प्रस्ताव पुण्याच्या कार्यालयास पाठवण्यात आला असून त्यानंतर पुढील मंजुरीसाठी मुंबईत जाईल आणि पुढे अंतिम मंजुरीसाठी नागपूरच्या वरिष्ठ कार्यालयाकडे जाईल. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर तज्ज्ञांचा चमू बार्शी व येडशी परिसरात वाघाच्या वास्तव्याच्या परिसरात येऊन त्याचा शोध घेईल आणि त्यास पकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येईल. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विदर्भाबाहेर असलेला महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्र प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात वसलेला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्य आणि शेजारच्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात विस्तारलेले चांदोली राष्ट्रीय उद्यान मिळून हा व्याघ्र प्रकल्प निर्माण झाला आहे.