जंगलातील बिबटय़ाला आता उसाच्या फडाची गोडी लागली असून, हा फड मानवल्याने त्यांची संख्याही प्रचंड वेगाने वाढू लागली आहे. बिबटय़ाच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी त्यांचे संततिनियमन करण्याचा सरकारचा विचार असून, केंद्राकडे तसा प्रस्ताव पाठवला जाणार आहे.
मार्जर कुळातील बिबटय़ा हा पूर्वी जंगलात राहात असे. नगर जिल्हय़ातील अकोले तालुक्यातील जंगलात १० वर्षांपूर्वी बिबटय़ा पाहायला मिळणे हे भंडादऱ्याला गेलेल्या पर्यटकांसाठी भाग्याचा क्षण असे. पण आता उदंड बिबटे झाले आहेत. जंगलातला अधिवास त्यांना मानवला नाही. तेवढा उसाच्या फडातला अधिवास त्यांना मानवला आहे. बिबटे मनुष्यवस्तीजवळ राहायला घाबरत नाहीत. जंगलात असताना त्यांना खायला पुरेसे भक्ष्य मिळत नसे. पाळीव जनावरे, कुत्री, रानडुकरे हे बिबटय़ाचे मुख्य खाद्य आहे. आता उत्तर नगर जिल्ह्यातील गोदावरी, मुळा व प्रवरा या नद्यांच्या काठी तसेच भंडारदरा, मुळा, दारणा व गंगापूरच्या पाण्याने बागायती असलेल्या श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, अकोले, नेवासे, राहुरी या भागात ऊसशेती फुलली आहे.
दिवसा उसाच्या फडात राहायचे अन् रात्री गावात घुसून कुत्री, शेळय़ा, मेंढय़ा फस्त करायच्या. बिबटय़ाला हे चांगलेच मानवले. त्यामुळे त्याने उसाच्या फडातच आपला अधिवास सुरू केला. जिल्ह्यातील बागायती भागात थोडेथोडके नाही तर ३०० बिबटे आहेत. त्यांची संख्या वाढत आहे. एकूण बिबटय़ांपैकी निम्म्या माद्या धरल्या तरी सहा महिन्यांतून एका मादीला तीन पिले होतात. ही पिले जगतात. त्यामुळे किमान दोन-तीनशेपेक्षा जास्त बिबटे वर्षभरात वाढणार आहेत. या संख्येला आवर कसा घालायचा हा मोठा प्रश्न आहे.
पूर्वी जंगलात बिबटय़ाच्या मादीने पिलांना जन्म दिला तरी ती जगत नसत. अन्य प्राणी त्यांना खाऊन टाकत. पण उसात बिबटय़ाची सर्व पिले जगतात असाही वन खात्याच्या अधिकाऱ्यांचा अनुभव आहे. वन खाते पकडलेले बिबटे हे मेळघाटचे जंगल व कोयना अभयारण्यात सोडते. पण तरीदेखील त्यांची संख्या वाढत आहे. कळस ते शेवगाव या दोनशे किलोमीटरच्या टापूत उसाच्या पिकात त्यांचा वाढता वावर हा गावातील लोकांसाठी त्रासदायक ठरला आहे. भूक लागली की तो गावात येतो. लोकांना घाबरत नाही, कुत्रे अथवा शेळीचे भक्ष्य मिळाले की पुन्हा उसात जातो. बिबटय़ामुळे उसातील कोल्हे व लांडगेही संपले आहेत. शेवगाव तालुक्यात रानडुकरांचा पूर्वी त्रास होता. पण बिबटय़ांनी रानडुकरे फस्त केली आहेत. बिबटय़ांना भक्ष्य मिळाले नाही की ते मानवी वस्तीवर हल्ले करतात. त्यामुळे लोकात घबराट उडते. दिवसाआड कुठल्यातरी गावात पिंजरा लावून बिबटय़ा पकडण्याचे काम वन खात्याला करावे लागते. पूर्वी बिबटय़ा बघायला गर्दी होत असे. पण आता पूर्वीसारखे आकर्षणही लोकांना राहिले नाही. वन खात्याने पर्यावरणवादी व प्राणिमित्रांचा विरोध होऊ नये म्हणून बिबटय़ांचे संततिनियमन करण्याच्या प्रस्तावाबद्दल गोपनीयता बाळगली आहे. केंद्राकडे तसा प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
बिबटय़ाबद्दल जनजागृती करून लोकांचे गैरसमज दूर करण्याचा प्रस्तावही वन खात्याचा आहे. त्यासाठी लवकरच बिबटय़ांचा वावर असलेल्या भागात जागृती मोहीम हाती घेतली जाणार आहे. हरिण, काळवीट व बिबटे वाढल्याने सामाजिक प्रश्न तयार झाले आहेत. त्याचा गुंता वन खात्याला आज तरी सुटता सुटत नाही अशी परिस्थिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा