अलिबाग – कोकण किनारपट्टीवर सातत्याने उद्भवणाऱ्या आपत्ती लक्षात घेऊन, रायगड जिल्ह्यातील महाड येथे कायमस्वरुपी एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एक तुकडी तैनात करण्यात यावी, असा प्रस्ताव राज्यसरकारच्यावतीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आला होता. मात्र प्रस्ताव पाठवून तीन वर्षे लोटली तरी त्यावर ठोस निर्णय होऊ शकलेला नाही.
२०१८ मधील महाड इमारत दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीला घटना स्थळावर पोहोचण्यासाठी पाच तासांचा कालावधी लागला होता. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्याचे काम जोमाने सुरू होण्यासाठी उशीर झाला. आंबेनळी बस दुर्घटना आणि महाड येथील सावित्री पूल दुर्घटना, महाड येथील महापूर या आपत्तीच्या वेळीही आपत्ती प्रतिसाद दलांच्या जवानांनी घटना स्थळी दाखल होण्यास बराच कालावधी लागला होता. ही बाब लक्षात घेऊन आता रायगड जिल्ह्यातील महाड येथे एनडीआरएफचा कायमस्वरुपी बेस कॅम्प तैनात करण्यात यावा असा निर्णय राज्यसरकारने घेतला होता.
हेही वाचा – “मला तडजोड करावी लागली, तर मी…”, राज ठाकरेंचं मोठं विधान
आपत्तीनंतर तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करणे आवश्यक असते. त्यामुळे आपदग्रस्तांना होणारा धोका कमी होऊ शकतो. पण मदत व बचाव पथके जर घटनेच्या ठिकाणी उशिरा दाखल झाली तर आपत्तीत अडकलेल्या व्यक्तींचे जीव धोक्यात येऊ शकतात. रायगड जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात आंबा सावित्री आणि कुंडलिका नद्यांना पूर येतो. महाड, रोहा आणि नागोठणे परीसराला पूरस्थिती निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन आता रायगड जिल्ह्यात एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा कायमस्वरुपी कॅम्प तैनात करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली होती. याची दखल घेऊन राज्यसरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडे याबाबतचा प्रस्ताव २०२० साली पाठविला होता.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून तत्कालीन संचालक, अभय यावलकर यांनी महासंचालक, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, नवी दिल्ली यांना प्रस्ताव अंतिम मंजुरीकरिता पाठविला होता. पण तीन वर्षे लोटली तरी याबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. महत्वाची बाब म्हणजे महाड येथे एनडीआरएफच्या बेस कँम्पसाठी राज्यसरकारने पाच हेक्टर पशुसंवर्धन विभागाची जागा हस्तांतरीत केली आहे. त्यामुळे या प्रस्तावाला मंजूरी मिळाली तर तातडीने बेस कँम्प उभारणीचे काम सुरू होऊ शकणार आहे.
कोकण किनारपट्टीवर एनडीआरएफ कॅम्प का महत्त्वाचा?
किनारपट्टीच्या या भागात वार्षिक पर्जन्यमान सरासरी ३ हजार ५०० मि.मी. पेक्षाही जास्त आहे. तर रायगड जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमान सरासरी ३ हजार १२० मि.मी आहे. जिल्ह्यात १ हजार ५०० औद्योगिक प्रकल्प असून तब्बल ६० प्रकल्प हे अपघाताची भीती असणारे आहेत. मागील १० वर्षांत रायगड जिल्ह्याने १५ आपत्ती अनुभवल्या आहेत. आणि त्यातील बहुतांश घटनांमध्ये आपत्ती निवारणासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने मदत केली आहे. यातील निदर्शनास आलेली बाब म्हणजे आपत्ती प्रसंगी या पथकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी आठ तासांपेक्षाही जास्त वेळ लागला, आपत्तीनंतर तात्काळ मदतकार्यासाठी सुरुवातीचा जो अत्यंत महत्त्वाचा कालावधी असतो तोच कालावधी वेळेवर पोहोचता न आल्याने वाया जातो आणि त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळते. हीबाब लक्षात घेऊन कोकणात मध्यवर्ती ठिकाण असलेल्या महाड येथे बेस कॅम्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान बेस कॅम्पचा मुद्दा केंद्र स्तरावर प्रलंबित असला तरी येत्या १५ जूलैपासून एनडीआरएफची २५ जणांची एक तुकडी महाड येथे तैनात केली जाणार आहे. पावसाळ्याचे दोन महिने ही तुकडी महाड येथे वास्तव्याला असणार आहे. महाड येथील रमाबाई आंबेडकर स्मारकात एनडीआरएफ पथकासाठी तात्पुरती वास्तव्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. बेस कॅम्पसाठी पाठपुरावा नियमित सुरू असल्याची माहिती कार्यालयाने दिली आहे.