पंढरपूर : राज्यातील जनतेच्या जीवनात सुखसमृद्धी व्हावी आणि करोनासह सर्व अडचणी दूर करण्याचे साकडे विठ्ठलाचरणी घातले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंडय़ा निघतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात राज्य शासन कोठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिली.
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या पत्नी लता शिंदे, तर मानाचे वारकरी मुरली भगवान नवले आणि जिजाबाई मुरली नवले ( रा.मु.पो. रुई, ता. गेवराई, जि. बीड) या दाम्पत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. महापूजेनंतर विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह समितीचे अन्य सदस्य, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
शासन शेतकरी, वारकरी, शेतमजूर व कामगार यांच्यासह राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यात आषाढी एकादशीची वारी एक महापर्व असून या वारीला एक मोठी परंपरा लाभलेली आहे. आषाढी एकादशीला महापूजा करण्याचा सन्मान मिळाल्याने हा दिवस जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
आजच्या शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून वर्षभरासाठी देण्यात येणाऱ्या मोफत पासचे वितरणही त्यांच्या हस्ते झाले. यावेळी एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक सुजय जाधव, उपमहाव्यवस्थापक अजित गायकवाड व विभाग नियंत्रक विलास राठोड उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे व मान्यवरांच्या हस्ते ‘रिंगण’ या वारी विशेषांकाचे प्रकाशनदेखील याप्रसंगी करण्यात आले.
प्रारंभी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे यांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. औसेकर महाराज यांनी प्रास्ताविक केले, तर आभार समिती सदस्य प्रकाश जंजाळकर महाराज यांनी मानले. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, बंडू जाधव, आमदार दीपक केसरकर, तानाजी सावंत, दादा भुसे, संजय राठोड, शहाजीबापू पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, भरतशेठ गोगावले, रवींद्र फाटक, राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार विजय शिवतारे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.