छत्रपती संभाजी महाराजांविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने बारामतीमध्ये अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तसेच मोर्चाही काढण्यात आला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात वादग्रस्त विधान केले होते. त्याविरोधात भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका स्वीकारली असून राज्यभर आंदोलने करण्यात येत आहेत.
त्याचे पडसाद अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्येही उमटले. भाजप आणि मित्रपक्षांच्या वतीने बारामतीमध्ये मोर्चा काढत वादग्रस्त विधानाचा निषेध नोंदविण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात संघटन सरचिटणीस धर्मेद्र खांडरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामटे, बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, रंजन तावरे, तानाजी थोरात, सुरेंद्र जेवरे, मारूती वनवे, देवेंद्र बनकर यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. अजित पवार यांनी माफी मागावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.