पारनेर तालुक्यातील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीविरोधातील आंदोलनात सभासद व कामगारांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा मंगळवारी जाहीर निषेध केला. तसा ठरावच या आंदोलकांनी एकमताने मंजूर केला.थकीत कर्जाच्या वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने पारनेर कारखान्याच्या विक्रीचा निर्णय घेतला आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याला तालुक्यातील शेतकरी व कारखान्याच्या कामगारांचा एकमुखी विरोध आहे. साखरेच्या विक्रीतून मिळालेले पैसे व अन्य उत्पन्नातून कारखान्याचे बरेचसे कर्ज फेडले जाऊ शकते. तसा निर्णय घेऊन कारखान्याची विक्री न करता दीर्घ मुदतीने तो खासगी कंपनीस चालवण्यास द्यावा अशी या लोकांची मागणी आहे. या प्रश्नात हजारे यांनी लक्ष घालून तालुक्याची कामधेनू वाचवावी अशी मागणी या लोकांनी त्यांच्याक डे केली होती, मात्र हजारे यांनी त्यास नकार दिल्याने कारखान्याचे सभासद व कामगारांनी त्यांच्या निषेधाचा ठराव मांडून तो एकमताने मंजूर केला.     
या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी अण्णा हजारे यांनी पुढाकार घ्यावा अशी सभासद तसेच कामगारांची मागणी होती. हजारे यांची त्यांनी तीनदा भेट घेऊन विनंतीही केली होती. त्यांनी राज्य सहकारी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करावी, अशी मागणी होती. त्यास हजारे यांनी असमर्थता दाखविल्यानंतर कारखाना विक्रीच्या विरोधातील आंदोलनास तरी त्यांनी पाठिंबा जाहीर करावा अशी अखेरची मागणी करण्यात आली. त्यालाही हजारे यांनी नकार दिला.
मी या कारखान्याचा सभासद नाही, त्यामुळे आंदोलनाविषयी आपणास काही घेणेदेणे नाही, तुमचे आंदोलन तुम्हीच करा असे हजारे यांनी तालुक्यातील या आंदोलकांना बजावले. या आंदोलकांनी केलेल्या रास्ता रोका आंदोलनात हजारे यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठवली. तालुक्यातील जनतेची रोजीरोटी हिरावली जात असताना अण्णा लक्ष घालत नाहीत. आम्हाला अण्णांच्या जनलोकपालचा उपयोग काय, असा सवालही आला. अखेर कामगार संघटनेचे नेते शिवाजी औटी यांनी  हजारे यांचे कार्य मोठे असल्याने त्यांच्या निषेधाचा ठराव करणे योग्य होणार नसल्याचे सांगितले. मात्र त्यास आंदोलकांनी आक्षेप घेत निषेधाचा ठराव झालाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली. अखेर आदर राखून आंदोलनास हजारे यांचा निषेध करीत असल्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

Story img Loader