लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परभणी : ‘भिकारीसुध्दा एक रूपया घेत नाही, आम्ही एक रूपयात शेतकर्‍यांना पीक विमा देतो’ असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले असून याचे तीव्र पडसाद परभणी जिल्ह्यातही उमटले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषीमंत्री कोकाटे यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केले.

कृषीमंत्री कोकाटे यांनी शेतकर्‍यांची तुलना भिकार्‍याबरोबर केल्याने संताप व्यक्त करत शेतकर्‍यांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला. पीक विमा घोटाळा प्रकरणात सत्ताधारी पक्षाचे लोक सामील आहेत. अद्याप त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या सरकारमधील कृषीमंत्री शेतकर्‍यांना लाचार, भिकारी संबोधून असे मूर्खासारखे वक्तव्ये करतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत असताना आणि कापूस व सोयाबीनचा प्रश्न सध्या गंभीर झालेला असताना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याऐवजी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम कृषिमंत्र्यांनी केले आहे अशी प्रतिक्रिया यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी दिली आहे. या आंदोलनात किशोर ढगे यांच्यासह रामप्रसाद गमे, गजानन तुरे, मुंजा लोडे, राजपाल देशमुख, सचिन दुगाने, माऊली दुधाटे, व्यंकटी पवार आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest against controversial statement of agriculture minister manikrao kokate in parbhani mrj