जैतापूर येथील प्रस्तावित अणुउर्जा प्रकल्पाच्या प्रतिकृतीचे फुगे उद्या (१४ नोव्हेंबर) बालदिनी हवेत सोडून प्रकल्पाला विरोध व्यक्त करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाच्या विरोधात नव्याने स्थापन झालेल्या जनहक्क समितीतर्फे आयोजित या पहिल्याच अभिनव उपक्रमाबद्दल माहिती देताना समितीचे सचिव दीपक नागले यांनी सांगितले की, प्रकल्पाच्या प्रतिकृतीचे एक हजार फुगे उद्या सकाळी दहा वाजता साखरी नाटे येथे सोडण्यात येणार आहेत. प्रस्तावित प्रकल्पाचा बालकांवर होऊ शकणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधण्यासाठी हे अभिनव आंदोलन आहे. हवेत सोडल्या जाणाऱ्या या फुग्यांना पोस्टकार्ड जोडण्यात येणार आहे.
हे फुगे जेथे जाऊन पडतील तेथील रहिवाशांनी त्यावर आपले नाव-पत्ता लिहून कार्ड पुन्हा पोस्टात टाकायचे आहे. समितीचे अध्यक्ष भिकाजी वाघधरे, प्रदीप इंदुलकर, प्रा. सदानंद मोरे, मच्छिमार नेते अमजद बोरकर इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
या प्रकल्पाला सुरवातीपासून विरोध केलेल्या प्रवीण गवाणकर यांच्या नेतृत्वाखालील माडबन जनहित सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी नुकसानभरपाई स्वीकारून समझोता केल्यामुळे त्यांची जागा वाघधरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जनहक्क समितीने घेतली आहे. त्यानंतर समितीचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. त्यामुळे त्याबाबत उत्सुकता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा