सहकारी साखर कारखाने बंद पाडून त्यांचा ऊस आपल्या खाजगी कारखान्यांसाठी पळविण्याचा सरकारमधील खासगी साखर कारखानदारांचा डाव असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केला.
खाजगी साखर कारखानदारांनी गतवर्षी सहकारी साखर कारखान्यांच्या तुलनेत शेतकऱ्यांना टनामागे पाचशे रुपये कमी दिले असून ऊस भावाचे सध्या सुरु असलेले आंदोलन संपताच आपण खाजगी साखर कारखानदारांच्या पाठीमागे लागणार आहोत, असे त्यांनी सांगितले. राज्यातील खाजगी साखर कारखाने काही मंत्र्यांसह राज्यातील बडय़ा नेत्यांचे आहेत. सहकारी साखर कारखान्यांनी गतवर्षी २५००-२६०० रुपये भाव दिला असताना एकाही खाजगी कारखान्याने दोन हजार रुपयांपेक्षा जास्त भाव दिलेला नाही. हे आंदोलन संपताच आपण या कारखान्यांना गतवर्षीचा हिशोब मागणार आहे. सहकारी साखर कारखान्यांबरोबरचा आमचा संघर्ष हे घरघुती भांडण आहे. आंदोलन संपताच आमचा ऊस सहकारी साखर कारखान्यांनाच देणार आहोत. कारण ते कारखाने आमचे आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे दोन खाजगी व एक सहकारी असे तीन कारखाने आहेत. सहकार मंत्री या नात्याने ते राज्याची जबाबदारी घेणार नसले तरी किमान आपल्या कारखान्याचे प्रमुख या नात्याने त्यांनी त्यांच्या कारखान्याचा भाव जाहीर करावा यासाठी ७ नोव्हेंबर रोजी इंदापूर येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा