लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग : राज्य सरकारच्या प्रस्तावित विशेष जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह, विवीध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. विधेयक मागे घ्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शेतकरी भवन येथून या मोर्चाची सुरुवात झाली. शहरातील विविध भागातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला. पोलिसांनी हिराकोट तलावाजवळ मोर्चा अडवला. नंतर मोर्चाचे रुपांतर छोटेखानी सभेत झाले. या मोर्चाला शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, काँग्रेसच्या प्रदेश सचिव नंदा म्हात्रे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे आणि सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी संबोधित केले.

राज्य सरकारने शहरी भागातील नक्षलवादी संघटनांचा बिमोड करण्यासाठी विशेष जनसुरक्षा विधेयक आणले आहे असे सांगितले जात आहे. मात्र या विधेयकात शहरी नक्षलवाद हा शब्दही दिसून येत नाही. त्यामुळे शहरी नक्षलवादाच्या व्याख्याही या विधेयकात नमूद करण्यात आलेले नाही. केवळ बेकायदेशीर कृत्य आणि ते करणाऱ्या बेकायदेशीर संघटना येवढाच उल्लेख विधेयकात करण्यात आला आहे. त्यामुळे विधेयकाच्या आडून सामाजिक संघटनांची कोंडी करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

हे विधेयक असंविधानिक आणि अनियंत्रित असून त्याचा गैरवापर केला जाण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, यांच्या अभिव्यक्त स्वातंत्र्यावर या कायद्यामुळे गदा येणार आहे. त्यामुळे हे विधेयक तात्काळ रद्द करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टिका करणे हा लोकशाही व्यवस्थेचा गाभा आहे. नागरिकांच्या या अधिकारावर गदा आणण्याचे काम या विधेयकाच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यामुळे हे विधेयक बिनशर्त मागे घेण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हाधिकारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, शिवसेना उध्दव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, भारत जोडो अभियान, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

हा संविधान विरोधी कायदा आहे. त्यामुळे तो मागे घ्यायला हवा, सरकारने बहुमताच्या जोरावर जर कायदा पुढे रेटण्याचा प्रयत्न केला तर न्यायालयात जाऊन आम्ही याविरोधात दाद मागणार आहोत.

उल्का महाजन, नेत्या, सर्वहारा जन आंदोलन

शहरी नक्षलवादाच्या रोखण्याच्या नावाखाली आणीबाणी पेक्षा कठोर कायदा जन सुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून आणला जात आहे. जनसुरक्षेच्या गोंडस नावाखाली करण संविधानाने दिलेल्या अधिकारांवर गदा आणण्याचे काम सरकार करत असेल तर त्याला कडाडून विरोध व्हायला हवा, आज प्रातिनिधीक मोर्चा काढून आम्ही या विधेयकाला विरोध करत आहोत. सरकारने त्याची दखल घ्यावी अन्यथा रायगड स्टाईलने उग्र आंदोलन केले जाईल. -जयंत पाटील, शेकाप सरचिटणीस