सोलापूर : जम्मू-काश्मीरमध्ये पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरात सर्वपक्षीयांनी रस्त्यावर येऊन स्वतंत्र आंदोलनाद्वारे तीव्र संताप व्यक्त केला. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात ३७ पर्यटकांची क्रूर हत्या झाली. या घटनेबद्दल देशभर संताप व्यक्त होत आहे. सोलापुरात सत्ताधारी भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष, काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आदी पक्षांच्या वतीने रस्त्यावर येऊन या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. तसेच पाकिस्तानचा ध्वज पायदळी तुडवून जाळण्यात आला. या वेळी पाकिस्तानच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर भाजप व दोन्ही शिवसेना पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन स्वतंत्रपणे आंदोलन केले, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर आंदोलन केले.

भाजपच्या आंदोलनात आमदार विजय देशमुख व पक्षाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह माजी आमदार नरसिंग मेंगजी, महापालिका माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, मोहन डांगरे, संजय कोळी, राजकुमार पाटील आदी सहभागी झाले होते. आमदार देशमुख यांनी, पाकिस्तानचे शंभर पापे झाले असून, आता भारताने पाकिस्तानचा नायनाट करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने दोन ठिकाणी आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी केले. या वेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानचा ध्वज जाळून तीव्र निदर्शने केली. मोदींनी पाकिस्तानात सैन्य घुसवावे, असे मत जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी व्यक्त केले. या आंदोलनात गणेश वानकर, प्रताप चव्हाण, दत्तात्रय गणेशकर, जगदीश कलकेरी आदी सहभागी झाले होते.

काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस भवनासमोर पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. काश्मीरमध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेला दहशतवादी भ्याड हल्ला असून, देशाच्या विरोधात असल्याचे मत नरोटे यांनी व्यक्त केले. माजी महापौर अलका राठोड, आरिफ शेख, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, सुदीप चाकोते यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा या आंदोलनात सहभाग होता.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत व जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाकिस्तानच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. आंदोलनात माजी शहरप्रमुख मनोज शेजवाल, तुकाराम मस्के, संजय सरवदे, प्रशांत वायकसकर, रूपा चव्हाण, गीता गवळी, अश्विनी भोसले आदींनी सहभाग घेतला होता.