आरोंदा बंदर जेटी हे पोर्तुगाल काळापासून सुरू आहे. सदर बंदर लवकरात लवकर सुरू होण्यासाठी आणि विरोध करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी लवकरात लवकर आरोंदा गावातर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आरोंदा बंदर समर्थक सुमारे २०० कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन दिला. तत्पूर्वी, एक पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात विरोध करणाऱ्यांचा समाचार घेण्यात आला.
आरोंदा सरपंच आत्माराम आचरेकर, आरोंदा मच्छीमार संघटना अध्यक्ष उपसरपंच वसंत चोडणकर, पंचायत समिती सदस्या गौरी आरोंदेकर, सोसायटी चेअरमन रघुनाथ नाईक, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश नाईक, अजित नाईक, ग्रामपंचायत सदस्या अपर्णा  नाईक, राजेश पेडणेकर, अनंत नाईक, अमेय आरोंदेकर, राजन आरोंदेकर, विष्णू बुडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पोर्तुगालकालीन या बंदराचा विकास मेसर्स व्हाइट ऑर्चिड इस्टेट प्रा. लि. कंपनीने हाती घेतला आहे. त्याला सर्वाचा पाठिंबा असून, हे बंदर जलद गतीने विकसित व्हावे म्हणून शासनाने प्रयत्न करावेत. स्थानिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार देणाऱ्या बंदराचा विकास करण्यासाठी पालकमंत्री नारायण राणे यांनाही ग्रामपंचायतीने प्रस्ताव दिल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
जिल्ह्य़ातील काही राजकीय पक्षांचे पुढारी बंदराला विरोध करून गावातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या विघ्नसंतोषी व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि लवकरात लवकर बंदर सुरू करण्यास कंपनीला आदेश द्यावेत अन्यथा बंदराच्या कामासाठी आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा लोकांनी निवेदनाद्वारे दिला आहे. नायब तहसीलदार बोर्रजुवेकर यांनी निवेदन स्वीकारले तेव्हा गावासोबत मनोज नाईक, महेश सारंग, राजू गावडे, प्रमोद गावडे आदी उपस्थित होते.
आरोंदा बंदराचे काम जलद गतीने सुरू करून रोजगार निर्माण व्हावा म्हणून गाव एकटवला आहे, असे प्रकाश नाईक म्हणाले. रोजगार निर्माण होणाऱ्या या बंदराला विरोध असण्याचा प्रश्नच नाही, समज-गैरसमज दूर ठेवून चर्चा व्हायला पाहिजे, अशी भूमिका आमची आहे, असे प्रकाश नाईक म्हणाले.
आमदार जयंत पाटील या बंदराचे सल्लागार आहेत. त्यांनी रायगडमधील बंदर विकास पाहण्यासाठी सर्वाना निमंत्रण केले आहे. सर्वानी बंदर पाहा आणि नंतर विरोध करा, असे सांगितले, पण बंदराला विरोध करणाऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिलेला नाही. माजी आमदार राजन तेली यांनीही विकसित बंदरावर नेण्याची तयारी दर्शवून तज्ज्ञांना आणून मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शविली, त्याला आम्हा सर्वाचा पाठिंबा आहे, पण विरोधाला विरोध करणाऱ्यांनी प्रतिसाद देण्यास टाळाटाळ करणे हे गावाच्या हिताच्या विरोधात आहे, असे प्रकाश नाईक म्हणाले.
विकास सोसायटीचे माजी चेअरमन अजित नाईक म्हणाले, गावच्या विकास कामात राजकारण नको. विकासातून रोजगार मिळणार असल्याची जाणीव ठेवून माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पावले टाकणे आवश्यक होते, पण त्यांनी रोजगार मुद्दा दुर्लक्षित केला आहे. वास्तविक विरोध करताना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे त्यांचे कर्तव्य आहे, असे अजित नाईक म्हणाले.
मच्छीमार संघटना नेते राजेश पेडणेकर यांनी आरोंदा बंदर व्हावे म्हणून आमचा पाठिंबा आहे. कांदळवन तोडप्रकरणी पर्यावरणाचा मुद्दा उभा करणारे कोठे होते? त्या वेळी मच्छीमारांना त्यांनी पाठिंबा कशासाठी दिला नाही. बंदर विकास व रोजगाराला सर्वानीच साथ द्यावी, असे आवाहन केले. मच्छीमारांना कोणताही त्रास होणार नाही, खाडीतील दगड फोडल्याने कोणताही धोका निर्माण होणार नाही. उलट मच्छीमारांना रोजगार उपलब्ध होईल, असे बुडे म्हणाले. आमदार जयंत पाटील व राजन तेली यांनी स्थानिकांना रोजगार देण्याचे स्पष्ट केले असून, मच्छीमारांना त्याचा फायदाच होणार आहे, त्यामुळे मच्छीमारांचा बंदराला विरोध नाही, असे वसंत चोडणकर म्हणाले.

Story img Loader