छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक : राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र झाले असून, नेत्यांना गावबंदीचे लोण अनेक जिल्ह्यांत पसरले आहे. खासदार प्रताप चिखलीकर, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, हसन मुश्रीफ, जयप्रकाश दांडेगावकर, जयप्रकाश मुंदडा आदींना शुक्रवारी आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे.
हेही वाचा >>> “भाजपाकडून ५५ मिनिटांत व्हिडीओ डिलिट”, सुषमा अंधारेंकडून प्रश्नांचा भडीमार; म्हणाल्या, “दिल्लीतून…”
जयप्रकाश दांडेगावकर आणि जयप्रकाश मुंदडा या दोन्ही नेत्यांना शुक्रवारी मराठा आंदोलकांनी गावात प्रवेश करण्यापासून रोखले. नांदेडचे खासदार प्रताप चिखलीकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. आमदार राहुल पाटील यांना मराठा आंदोलकांनी मानवत येथे एका उद्घाटन कार्यक्रमापासून रोखले. दुसरीकडे, हिंगोलीचे भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला.
कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना मराठा समाजाच्या आंदोलकांनी शुक्रवारी रेल्वे स्थानकात रोखले.
पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शिर्डीत गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात आरक्षण प्रश्न बेदखल केल्याच्या निषेधार्थ सोलापुरात मराठा आंदोलकांनी पंतप्रधान मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन केले.
आरक्षणाविरोधात षड्यंत्र : जरांगे
शिर्डी दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा आरक्षणाबाबत भाष्य न केल्याने आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी टीका केली. पंतप्रधानांनी हेतूपूर्वक हा विषय काढला नाही की त्यांना तसे सांगण्यात आले होते, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून केला. मराठा आरक्षणाविरोधात षड्यंत्र सुरू असल्याचेही जरांगे म्हणाले.
रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा तात्पुरती स्थगित
पुणे : युवकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी रसुरू केलेली युवा संघर्ष यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. रोहित पवार यांनी त्याबाबतचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणीही त्यांनी केली. युवकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी युवा संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली होती.
‘एपीएमसी’ बंद यशस्वी
नवी मुंबई : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यास माथाडी संघटनेने शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद यशस्वी झाला. भाजीपाला आणि फळ बाजार या बाजार समिती बंदमधून वगळण्यात आले होते. मसाला, कांदा बटाटा आणि दाणा मार्केट मात्र बंद ठेवण्यात आले होते.
‘आश्वासन कशाला दिले’
अलिबाग : जरांगे पाटील यांनी काही मागण्या केल्या आहेत. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संवाद साधला. त्यांना ३० दिवसांची मुदत दिली होती. त्यावर जरांगेंनी वाढवून मुदत दिली होती. जे काम होणार नसेल तो शब्द कधी देऊ नये. त्यामुळे उपोषण करणाऱ्यांना दोष देता येणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांना कानपिचक्या दिल्या.
मराठा आरक्षणप्रश्नी हस्तक्षेपास केंद्राचा नकार?
मुंबई : मराठा आरक्षणप्रकरणी हस्तक्षेप करण्यास किंवा तूर्तास कोणताही निर्णय घेण्यास केंद्र सरकारने नकार दिला असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी लोकसत्ताला सांगितले. केंद्राला या प्रकरणात न ओढता राज्य सरकारनेच आपल्या पातळीवर तोडगा काढावा, अशा सूचना भाजप पक्षश्रेष्ठींनी दिल्या आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांनी उपोषण आंदोलन मागे घ्यावे, यासाठी त्यांना कोणता ठोस प्रस्ताव द्यावा, याबाबत विचारविनिमय सुरू आहे.
इतर राज्यांत आंदोलनाची भीती
मराठा समाजाला आरक्षण दिल्यास पाटीदार, जाट, गुजर आदी समाजांकडूनही आरक्षणाची मागणी पुढे येईल. सध्या या समाजांना आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या १० टक्के आरक्षणाचा लाभ मिळत आहे. त्यामुळे आंदोलने शांत आहेत. पण आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविल्यास ती पुन्हा सुरू होतील.