सोलापूर : आधुनिक समाज घडविण्यासाठी हातभार लावणा-या महापुरूषांविषयी सातत्याने अपमानकारक वक्तव्ये करणारे मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पाय पडत असतील तर भिडे यांच्या अटकेची हिंमत राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार दाखवूच शकणार नाही. त्यासाठी आता भाजप नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरांसमोर आंदोलन करण्याची सूचना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.

अक्कलकोट येथे जाहीर सभेसाठी आंबेडकर आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी वार्तालाप केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी, भाजप व संघ परिवारावर जोरदार टीकास्त्र सोडले. संभाजी भिडे हे एकीकडे महापुरूषांच्या विरोधात विषारी गरळ ओकत असताना त्यांच्या अटकेची मागणी हौऊनसुध्दा कारवाई होत नाही. तर पोलीस संरक्षणात भिडे राज्यभर विषारी वक्तव्ये करीत फिरत आहेत. पंतप्रधान मोदी हेच जर भिडे यांचे पाय पडत असतील तर त्यांना अटक करण्याची कोणाची हिंमत होणार ? त्यामुळे भिडेंविरोधात आंदोलन करताना भाजप नेत्यांसह मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन करून दबाव वाढविण्याची गरज असल्याचे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, मागील दहा वर्षे आपण देशात भाजप व संघ परिवाराची सत्ता पाहतोय. अफवा फैलावून झुंडीने घेतले जाणारे बळी आणि दुसरीकडे भटक्या विमुक्त जमातींचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न, सत्ता राखण्यासाठी पुनःपुन्हा हिंदू-मुस्लिमांच्या दंगली घडविण्याचा खटाटोप होत आहे. शांतता आणि सुव्यवस्थेचे राज्य अशांततेत घालविण्याचा प्रयत्न होत आहे. गावागावात लव्ह-जिहादच्या खोट्या कल्पना पसरवून हिंदू मुलगी आणी मुस्लीम मुलगा शोधण्याचे काम सुरू आहे. एका भटक्या विमुक्त जमातीला दुस-या भटक्या विमुक्त जमातीशी लढविण्याचे काम सुरू झाले आहे. यातून दंगली घडवून सूड उगविले जात आहे. मणिपुरात हेच चालले आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला.

शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. अजित पवारांना भाजपकडे वळविल्यानंतर आता शरद पवारांकडे राहिले ते काय, असा सवालही आंबेडकर यांनी केला. भाजपच्या म्हणण्यानुसार अजित पवार यांची जागा तिहारच्या तुरूंगात होती. परंतु आता तिहार तुरूंगात जाण्याची वेळ येऊ नये म्हणून ते भाजपसोबत गेले आहेत. शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात जे आरोप केले आहेत, त्याचे खंडन ते करू शकत नाहीत, असेही मत आंबेडकर यांनी व्यक्त केले