सांगली : करजगी (ता. जत) येथील बालिकेवर अत्याचार करून करण्यात आलेल्या खूनाच्या निषेधार्थ जत शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी बंद पाळण्यात आला. संशयित आरोपीला आमच्या ताब्यात द्या, सत्वर फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत जतमध्ये मोर्चाही काढण्यात आला. दरम्यान, वैद्यकीय अहवालात पिडीतेवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून हा खटला जलद गती न्यायालयात चालविण्याची विनंती न्यायालयाना करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
करजगी येथील चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून खून केल्याचा प्रकार गुरूवारी दुपारी उघडकीस आला. यानंतर या घटनेच्या संतप्त प्रतिक्रिया जत तालुक्यासह जिल्ह्यात आज उमटल्या. आज जत शहरात दिवसभर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.शहरातील वैद्यकीय सेवा आणि औषध दुकाने वगळता सर्व व्यापारी पेठ बंद ठेवण्यात आली, तर तालुक्यातील संख, गुड्डापूर परिसरात बंद पाळण्यात आला. गुड्डापूर येथे जत-सोलापूर मार्गावर टायर जाळून महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली. दुपारी जतमध्ये मोर्चा काढून आरोपीच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. या मोर्चामध्ये सर्व पक्षिय कार्यकर्ते सहभागी झाले होते. आरोपीला जनतेच्या हवाली करा, त्याला सत्वर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी मोर्चाच्यावतीने प्रांताधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली.
मिरजेतही मोर्चा
करजगी घटनेच्या निषेधार्थ मिरज शहरात सर्व पक्षिय कार्यकर्त्यानी मोर्चा काढून नराधमाला पंधरा दिवसात कठोर शिक्षा ठोठावण्याची मागणी केली. यावेळी मोर्चाच्यावतीने उप विभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान, पोलीस अधिक्षक घुगे यांनी आज दुपारी पत्रकार बैठक बोलावून सदर घटनेची माहिती देताना सांगितले, करजगी येथील चार वर्षाची मुलगी बेपत्ता असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी तातडीने हालचाली करत शोध मोहिम राबविण्यात आली. संशयावरून पांडूरंग कळ्ळी (वय ४५) याला तात्काळ ताब्यात घेउन त्याच्या पत्र्याच्या घराची झडती घेतली असता लोखंडी पेटीत पिडीतेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर तिच्यावर अत्याचार करून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. संशयित आरोपीची पत्नी २० वर्षापासून विभक्त असून तो व त्याची आई दोघेच घरी राहतात. आई बाहेर गेल्यानंतर त्यांने हा प्रकार केला असल्याचे तपासात समोर आले असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. सदरचा प्रकार समोर आल्यानंतर गावात शांतता समितीची बैठक घेउन शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले असून जतसह गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन या प्रकरणाचा तपास उप अधिक्षक सुनील साळुंखे यांच्याकडे देण्यात आला असून लवकरात लवकर आरोपी विरूध्द न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येईल. तसेच हा खटला द्रुतगती न्यायालयात चालविण्यात यावा अशी विनंती न्यायालयाला करण्यात येईल असे पोलीस अधिक्षक श्री.घुगे यांनी यावेळी सांगितले.
करजगी खून प्रकरणातील संशयित आरोपी पांडूरंग कळ्ळी याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने आज दिले. त्याच्याविरुध्द २०१९ मध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.