भारताने नेहमीच परस्पर मैत्री व सौहार्दाचे संबंध ठेवण्याचे प्रयत्न केले असले तरी पाकिस्तान मात्र विरोधात कारवाया करून कायम घात करत असल्याने केंद्र सरकारने पाकिस्तानशी असणारे सर्व प्रकारचे राजनैतिक संबंध संपुष्टात आणावेत, या मागणीसाठी सोमवारी आमदार मौलाना मुफ्ती इस्माइल प्रमुख असलेल्या ‘तिसरा महाज’चे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ निदर्शने केली. पॅंूछ भागात पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करून निदर्शकांनी भारतातील पाकिस्तानचा दूतावास हटविण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली.
नगरसेवक एजाज उमर यांच्या नेतृत्वाखाली मोहम्मद अमिन मोहम्मद फारूक, मोहम्मद रशिद मोहम्मद अय्युब, शब्बीर खान अमिन खान, मुस्ताक खान मुसा खान, दीपक सावळे आदींनी निदर्शनात सहभाग नोंदविला. त्यास शिवसेनेचे आमदार दादा भुसे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष लोटन शेवाळे, सचिव अर्जुन दंडगव्हाळ यांच्यासह विविध संघटना व पक्ष कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. अलीकडेच भारतीय प्रदेशात घुसखोरी करून पाकिस्तानच्या सैनिकांनी पाच भारतीय जवानांची हत्या केली. तत्पूर्वी, जानेवारी महिन्यात दोन भारतीय जवानांचे शीर कापून नेण्यात आले होते.
पाकिस्तानकडून नेहमीच भारतविरोधी कारवाया केल्या जात असल्याने भारतीय सैनिकांवर शहीद होण्याची वेळ येते. या परिस्थितीत भारताकडून मात्र पाकिस्तानविरोधी ठोस कारवाई केली जात नसल्याबद्दल निदर्शकांनी खंत व्यक्त केली. राज्यकर्ते केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवून कालापव्यय करीत असल्याची टीकाही या वेळी करण्यात आली.
पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया आणि शासनकर्त्यांची त्या संबंधी बोटचेपी भूमिका यामुळे भारतीय सैन्याचे मनोबल खच्चीकरण होत असल्याची दखल घेऊन पाकिस्तानला धडा शिकविण्याची आता गरज निर्माण झाल्याचे मत मांडण्यात आले. तसेच पाकिस्तानात असलेले भारतीय दूतावास परत बोलावण्यात यावे आणि पाकिस्तानचे भारतातील दूतावास तात्काळ बंद करावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा