लोकशाही आणि समाजवादासाठी आग्रही असलेल्या राष्ट्र सेवा दल संघटनेतील गलथान कारभारामुळे पुण्यात मागील तीन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळत आहे. “राष्ट्र सेवा दल या लोकशाही-समाजवादासाठी आग्रही असलेल्या संघटनेत एकाधिकारशाहीचे संकट आलं आहे. मनमानी कारभाराला प्रश्नांकित करणाऱ्या कार्यकर्त्यांना दडपशाही सोसावी लागत आहे. हा हुकुमशाहीचा कारभार सहन केला जाणार नाही” असा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत एकबोटे यांनी दिला आहे.
राष्ट्र सेवा दलाचे माजी सहमंत्री विलास किरोते आंदोलकांची भूमिका मांडताना म्हणाले, “संघटनेच्या घटना दुरुस्तीच्या नावाखाली पूर्ण घटनाच बदलून निर्णय प्रक्रियेचा ताबा घेतला जात आहे. कपिल पाटील यांनी राष्ट्र सेवा दलाचा रिमोट कंट्रोल बनू नये.”
संघटनेच्या संविधानातील बदल आधीच्या घटना धर्मादायला मंजूर होत नाहीत, तोवर अजिबात बदल करु नका. यामुळे गुंते वाढतच जातील. संघटनेशी संबंधित नसलेले केवळ प्रतिष्ठेसाठी, केवळ मानाचे पद भूषवणारे, कळसूत्री विश्वस्तांची थेट नेमणूक करू नका. पूर्णवेळ कार्यकर्ता धोरणही किमान १० वर्षे काम केलेल्या अनुभवी पूर्णवेळ कार्यकर्त्यांना विचारुन राबवावा. एकाचवेळी अनेक संस्था-संघटनांचे मानधन घेणारे पूर्णवेळ कार्यकर्ते निवृत्त करा. कुणामुळेही ही संघटना कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधले जाणार नाही, याची खात्री संघटनेला द्या. त्यासाठी संघटनेत जिल्हा ते राष्ट्रीय स्तरावर कोणीही राजकीय पक्षातील पदाधिकारी सेवादलाच्या कोणत्याही पदावर नको. व्यावसायिक प्रकल्पांच्या नावाखाली सुरू असलेली आर्थिक उधळपट्टी बंद करा, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांकडून केल्या आहेत.
दरम्यान, राष्ट्र सेवा दलाच्या माजी विश्वस्त झेलम परांजपे आपली भूमिका मांडतांना म्हणाल्या, “संघटनेतील निष्ठावान कार्यकर्त्यांवरील शिस्तभंग कारवाई विनाअट मागे घ्यावी. संवादाचा मार्ग अवलंबून संघटनेतील पेच हाताळावेत.” यावेळी अरुण थोपटे, विद्याधर ठाकूर, मिहिर थत्ते, वसंत एकबोटे, प्रशांत दांडेकर, संदिप सोलापूरकर, चंद्रकांत शेंडगे, साधना शिंदे, लता बंडगर, शाम निलंगेकर, विनय सावंत, दत्ता पाकिरे, श्रीकांत लक्ष्मी शंकर, अलका एकबोटे, उमाकांत भावसार आदि कार्यकर्ते उपस्थित होते.