स्वाभिमानी शेतकरी युवा आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा यांना पलूस येथे काँग्रेसनेते, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या समोरच झालेल्या मारहाणीचे पडसाद सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी उमटले आहेत. या घटनेचा युवानेते मनोज घोरपडे व सातारा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे निषेध करण्यात आला. दरम्यान, शेतक-यांवर अन्याय कराल तर आघाडी शासनातील मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा मनोज घोरपडे यांनी दिला आहे.
सांगली जिल्ह्यातील पलूस पंचायत समितीच्या आमसभेत उसाला एफआरपीप्रमाणे दर देण्याचा प्रश्न सांगली स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा यांनी उपस्थित केल्यानंतर त्यांना काही कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली. ही घटना लोकशाहीस मारक असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे. एका शेतक-याने आपल्या शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी आवाज उठवला, म्हणून राजकारण्यांचे बगलबच्चे जर एखाद्याला मारहाण करत असतील तर यापुढे त्यांची गय केली जाणार नाही. यापुढे जर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यांला अथवा न्यायासाठी आवाज उठवणा-या शेतक-यावर अन्याय केला तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिले जाईल असेही ते म्हणाले. आजपर्यंत शेतक-यांवर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आघाडी सरकारने मोठय़ा प्रमाणावर अन्याय केला आहे. अनेकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. हे जर असेच चालू राहिले तर सर्वसामान्य जनतेला व शेतक-यांना सोबत घेऊन दिला जाईल असा इशारा मनोज घोरपडे यांनी दिला आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी संदीप राजोबा यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला असून, याबाबतचे निवेदन शिष्टमंडळासमवेत कराडचे तहसीलदार सुधाकर भोसले यांना सादर केले आहे. या वेळी विभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी नितीन जगताप यांची उपस्थिती होती. संबंधित गुंडांवर कारवाई करा अन्यथा सक्त आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
संदीप राजोबा यांच्या मारहाणीचे सातारा, कराडमध्ये पडसाद
स्वाभिमानी शेतकरी युवा आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा यांना पलूस येथे काँग्रेसनेते, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या समोरच झालेल्या मारहाणीचे पडसाद सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी उमटले आहेत.
First published on: 24-06-2014 at 03:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest in satara karad by farmers organization in case of sandeep rajoba beaten case