लोकसत्ता वार्ताहर
परभणी : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात एकीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून न्यायालयीन लढाई सुरू असून, दुसरीकडे जनतेच्या माध्यमातून रस्त्यावरचाही संघर्ष आम्ही करत आहोत. सोमनाथ हा संविधानप्रेमी होता. न्यायालयीन कोठडीत पोलिसांनी त्याच्यावर अत्याचार करून त्याचा बळी घेतला. मात्र, वंचित बहुजन आघाडी सोमनाथच्या कुटुंबासोबत असून, न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केले.
सोमनाथ सूर्यवंशी, तसेच आंबेडकरी तरुणांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळण्यासाठी ‘शांतता मार्च’ आयोजित करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील आंदोलन मैदानावर या ‘शांतता मार्च’चे सभेत रूपांतर झाले. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. शनिवार बाजार परिसरातून सुरू झालेला हा शांतता मार्च शहरातील मुख्य रस्त्याने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येऊन पोहोचला.
शांतता मार्च शहरातील शनिवार बाजार येथून निघून गांधी पार्क, नारायण चाळमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील आंदोलन मैदानापर्यंत काढण्यात आला. पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, विटंबना प्रकरणानंतर पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आंबेडकरी तरुणांना पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मारहाण केली. मारहाणीत महिलांनादेखील सोडले नाही. आंबेडकरी वस्त्यांमध्ये जाऊन कोम्बिंग ऑपरेशन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाविषयी चुकीची माहिती दिली, असा आरोपही या वेळी त्यांनी केला.
या वेळी सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजयाबाई यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, की सोमनाथच्या मृत्यूनंतर देशभरातील अनेक पक्षांचे आमदार, खासदार, राजकीय नेते, मंत्री आले, पण बाळासाहेब आंबेडकर मात्र आमच्यासोबत सुरुवातीपासून सोमनाथच्या न्यायासाठी आहेत. या वेळी विजयाबाई यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूस पोलीस प्रशासनच कारणीभूत असून, पोलीस प्रशासनाने सोमनाथचा खून केला याचा पुनरुच्चार करत आरोपींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. वंचित बहुजन आघाडीच्या या शांतता मार्चमध्ये शहरातील आंबेडकरी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.