कर्जत – राष्ट्रसंत श्री शेख महंमद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील वारकरी, टाळकरी, माळकरी, कीर्तनकार, महाराज मंडळी समवेत नागरिकांनी आज आंदोलनाचा पवित्रा घेत श्रीगोंदा शहर बंदची हाक दिली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण शहरांमध्ये कडकडीत बंद पाळला.

सकाळी एस टि स्टॅन्ड पासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मोर्चा मध्ये सहभाग घेतला. तर व्यापारी असोसिएशन यांनी देखील उत्स्फूर्तपणे आपले दुकाने बंद ठेवत या आंदोलनाला पाठिंबा दिला.

धरणे आंदोलनावेळी व्यसनमुक्ती चे प्रवर्तक ह भ प बंडातात्या कराडकर, संत तुकाराम महाराज वंशज ह भ प माणिकराव महाराज मोरे , छोटे माऊली ह भ प माऊली महाराज कदम, माजी मंत्री बबनराव पाचपुते, खासदार निलेश लंके, आमदार विक्रम पाचपुते बाबासाहेब भोस, राजेंद्र नागवडे,घनश्याम शेलार,राजेंद्र म्हस्के, प्रणोती जगताप यांच्या सह अनेक पदाधिकारी व मोठ्या संख्येने वारकरी लागली उपस्थित होते.

यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर म्हणाले की, हिंदू व मुस्लिम या दोन समाजातील ऐक्याचे दर्शन म्हणजे श्री शेख मोहम्मद महाराज देवस्थान आहे. मात्र समाजकंटक जाणीवपूर्वक दोन समाजामध्ये दुपारी निर्माण करण्याची काम करीत आहे. वास्तविक पाहता शेख मोहम्मद महाराज एका विशिष्ट समाजाचे नसून ते वारकरी संप्रदायाचे व खास करून हिंदू समाजाचे दैवत आहेत. या ठिकाणी चुकीचा ट्रस्ट तयार करण्यात आला आहे. यामुळे माझी शासनाला विनंती आहे विनम्र न करता हे चुकीचे ट्रस्ट तात्काळ रद्द करावे. व या मंदिराचा विकास व जिर्णोद्धार तात्काळ करण्यात यावा.

यावेळी बोलताना आमदार विक्रमसिंह पाचपुते म्हणाले की, थोर संत शेख मोहम्मद महाराज देवस्थानचा जिर्णोद्धार झालाच पाहिजे अशी भावना या तालुक्यातील सर्व जनतेची आहे. आणि या चांगल्या कामाला विरोध करणे हे चुकीचे आहे.
खासदार निलेश लंके म्हणाले की, श्री शेख मोहम्मद महाराज देवस्थानविषयी सर्व हिंदूंची जवळचे नाते आहे. एका मुस्लीम व्यक्तीने ट्रस्ट करत यात्रा कमिटीच्या माध्यमातून काम करणाऱ्या लोकांना गुन्हेगार ठरवले. यामुळे हा ट्रस्ट तात्काळ बरखास्त करावा.

यावेळी राजेंद्र नागवडे, घनश्याम शेलार, प्रणोती जगताप, बाळासाहेब नाहाटा, त्यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. जो पर्यंत योग्य निर्णय प्रशासन घेत नाही तो पर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.