मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज (१४ फेब्रुवारी) त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृतीदेखील खालावली आहे. अशातच सकाळी त्यांच्या नाकातून रक्तस्राव झाला, पाठोपाठ पोटदुखी सुरू झाली आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांसह संपूर्ण समाजाला मनोज जरांगे यांची काळजी वाटू लागली आहे. जरांगे यांच्या काळजीने त्यांच्या समर्थकांनी आणि आंदोलकांनी आंतरवाली सराटीकडे (उपोषणस्थळी) कूच केली आहे. आज सकाळपासून आंतरवालीत गर्दी वाढू लागली आहे.
नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र द्यावं, प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रासह त्यांच्या सगेसोयऱ्यांचा आरक्षणात समावेश करावा, तसेच सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करावं या प्रमुख मागण्यांवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. यासाठीच ते उपोषणाला बसले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे आंदोलक आणि समाजबांधव त्यांना उपचार घेण्याची विनंती करत आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांनी आंदोलकांना भावनिक आवाहन केलं. पाटील म्हणाले, मी मेलो तर मला असंच सरकारच्या दारात नेऊन टाका आणि या सरकारला धारेवर धरा. सरकारने आपल्याला येत्या १८ ते १९ फेब्रुवारीपर्यंत आरक्षण दिलं नाही, अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर आपण मुंबईला जाऊ आणि सरकारला जाब विचारू. मी मेल्यावर तुम्ही सरकारला सोडू नका. मला तिकडे नेऊन टाका. सध्या आपण १८ फेब्रुवारीपर्यंत वाट बघू.
हे ही वाचा >> Prakash Ambedkar on Loksabha: लोकसभेसाठी प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना पाठिंबा, भूमिका केली स्पष्ट
दरम्यान, आंदोलक आणि सहकारी मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावे यासाठी विनवण्या करत आहेत. जरांगे पाटील यांचा एक सहकारी त्यांना म्हणाला, “सरकार जाऊदे खड्ड्यात, तुम्ही आत्ता उपचार घ्या, तुम्ही किमान आमच्यासाठी स्वतःवर उपचार करून घ्या.” सहकाऱ्यांचा टाहो ऐकून जरांगे पाटील त्यांना म्हणाले, त्यापेक्षा मला गाडीत टाका आणि मुंबईला न्या. आपण आता मुंबईला जाऊ. माझ्याबरोबर जास्त लोक येऊ नका. कारण जास्त आंदोलक तिकडे गेले तर ते लोक तुम्हाला अडचणीत आणतील. त्यापेक्षा मी एकटाच जातो.