सांगली : शेतकऱ्यांना भूमीहिन करुन महापूराचा धोका वाढविणारा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी सुरु असणाऱ्या आंदोलनावेळी शनिवारी पालकमंत्री सुरेश खाडे यांची  मोटार अडवण्यात आली. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉंग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खा. विशाल पाटील, आ. डॉ. विश्वजित कदम, आ. विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. महामार्ग स्थिगत करण्याऐवजी सरकारने रद्द करावा अशी आग्रही मागणी करण्यात आली.

पालकमंत्री खाडे नियोजन समितीच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येत असताना अडवण्यात आले. मंत्री खाडे यांनी मोटारीतून उतरुन निवेदन स्वीकारले. दरम्यान घडलेल्या या प्रकरणामुळे पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली.

हेही वाचा >>> मध्यरात्रीपर्यंत लांबलेल्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत काय ठरलं? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून प्रस्तावित असलेला शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावातुन जात आहे. शेटफळे,  घाटनांद्रे,  तिसंगी, डोंगरसोनी, सावळज,सिद्धेवाडी, अंजनी,सावर्डे, गव्हाण, वज्रचौंडे, मनेराजुरी, मतकुणकी, नागाव कवठे, कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलवाडी इत्यादी गावातील पाच हजार शेतकरी बाधित होत आहेत.  ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे, त्यांना जमिनीचा मोबदला अत्यंत कमी मिळणार आहे.

तासगाव, कवठेमहांकाळ व आटपाडी या तालुक्यात सिंचन योजना अलिकडेच पुर्ण झाल्या असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी जमिनी स्वभांडवलावर विकसित केल्या आहेत. त्यांचा फारच तोटा होणार आहे. काही शेतकरी भुमीहीन होणार आहेत. 

हेही वाचा >>> राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणावरून संघर्ष, संजय राऊतांनी स्पष्ट केली ठाकरे गटाची भूमिका; म्हणाले…

मिरज तालुक्यातील गावांना महापुराचा धोका मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे. या महामार्गासाठी कर्नाळ पासुन कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गावांपर्यंत भराव पडल्यास पावसाळ्यात कृष्णा आणी वारणा नद्यांचे पाणी पात्राबाहेर आल्यानंतर ते लवकर हटणार नाही. दुर्दैवाने महापुर आलाच तर सांगली शहर व परिसरातील गावांना फार मोठा फटका बसणार आहे.  ज्या कारणासाठी हा महामार्ग प्रस्तावीत केला आहे, ती सर्व देवस्थान शक्तिपीठे रत्नागिरी नागपुर या महामार्गाला जोडता येवु शकतात.  त्यामुळेच नवीन महामार्गाची गरज नाही. म्हणून शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.