लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना मोगलांनी कैद केल्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी ४०० मावळ्यांनी प्रयत्न केलेल्या शिराळा भुईकोट किल्ल्याच्या ठिकाणी स्मृतीस्थळ उभारणीसाठी अर्थ संकल्पामध्ये १३ कोटी ४० लाख रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट नव्या पिढीपुढे मांडण्याचा प्रयत्न आहे असे मत आमदार मानसिंगराव नाईक यांनी शुक्रवारी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

मोगल सैन्यांने छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्‍वरमध्ये कैद करून बहादूरगडला नेत असताना अल्प काळासाठी शिराळा येथील भुई कोट किल्ल्यात ठेवले होते. याच वेळी स्वराज्याच्या दुसर्‍या छत्रपतींची मोगलाच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न ४०० मावळ्यांनी केला होता. यामध्ये ज्योताजी केसरकर, आप्पासाहेब शास्त्री-दीक्षित, तुळाजी देशमुख, हरबा वडार या स्वराज्यांच्या शिलेदारांचा समावेश होता. याची नोंद इतिहासानेही घेतली आहे.

आणखी वाचा-मंगळवेढ्यात नायब तहसीलदारासह दोघे लाच प्रकरणात जेरबंद, उपविभागीय अधिकाऱ्याचीही होणार चौकशी

स्वराज्याचा हा इतिहास नव्या पिढीला प्रेरणादायी ठरावा यासाठी शिराळा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मृतीस्थळ उभा करण्यात यावे अशी मागणी करून २५ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मार्चमध्ये सादर झालेल्या लेखानुदानावेळीच मंजुरी देण्यात आली होती. आता अर्थसंकल्पामध्ये अर्थ तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पासाठी १३ कोटी ४० लाखाची तरतूद केली आहे.

याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. याच बरोबर ऐतिहासिक वाडा उभा करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील जन्मापासून कैद करून शिराळा किल्ल्यावर आणण्यापर्यंतची क्षण चित्रे भित्ती शिल्पाच्या माध्यमातून साकारण्यात येणार असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.