भारतीय अंतराळ संशोधन केंद्राच्या (इस्रो) ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकावरून (पोलर सॅटेलाइट लाँच व्हेईकल, पीएसएलव्ही सी-२८) शुक्रवारी रात्री एकाच वेळी पाच ब्रिटिश कृत्रिम उपग्रहांचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले. या यशस्वी मोहिमेने ‘इस्रो’च्या आणि पर्यायाने भारताच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे रोवले गेले.

* पीएसएलव्हीचे हे एकूण ३० वे उड्डाण होते. त्यापैकी एक उड्डाण पूर्ण अयशस्वी तर एक अंशत: यशस्वी झाले होते. अन्य २८ उड्डाणे पूर्ण यशस्वी ठरली आहेत. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत उपग्रह प्रक्षेपणाची किफायतशीर आणि खात्रीलायक सेवा देऊ शकण्याची भारताची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. ‘इस्रो’ने आजवर १९ देशांचे ४० उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले आहेत.
*‘इस्रो’ने आजवर हाती घेतलेल्या व्यापारी उपग्रह प्रक्षेपण मोहिमांपैकी या मोहिमेत सर्वाधिक वजनाचे उपग्रह अंतराळात सोडण्यात आले. पीएसएलव्ही सी-२८ वरील पाच उपग्रहांचे मिळून एकूण वजन १४४० किलोग्रॅम होते.
* या मोहिमेसाठी पीएसएलव्हीचा ‘एक्सएल’ हा प्रकार (नेहमीपेक्षा अधिक इंधनाच्या टाक्या जोडलेला) नवव्या वेळी वापरला गेला.
* या पाच उपग्रहांपैकी तीन डीएमसी-३ उपग्रह साधारण ३ मीटर उंचीचे होते. ते पीएसएलव्हीच्या सध्याच्या प्रक्षेपण कक्षात बसवणे हे एक आव्हान होते. हे उपग्रह पृथ्वीभोवती वेगवेगळ्या कक्षेत सोडण्यासाठी ‘इस्रो’ने ‘एल-अ‍ॅडॅप्टर’ नावाने ओळखला जाणारा सक्र्युलर लाँचर अ‍ॅडॅप्टर तसेच ‘मल्टिपल सॅटेलाइट अ‍ॅडॅप्टर व्हर्जन २’ (एमएसए-व्ही २) यांची खास रचना करून ते कार्यान्वित केले.
* उपग्रह प्रक्षेपणाची भारतातील वेळ रात्रीची होती. त्यामुळे ब्रिटनमधील उपग्रह नियंत्रकांना त्यांच्यासाठी योग्य वेळी उपग्रहांचे नियंत्रण स्वीकारणे सोपे गेले.
* एकाच प्रक्षेपकावरून एका वेळी वेगवेगळ्या कक्षेत एकापेक्षा जास्त उपग्रह सोडणे हे तांत्रिकदृष्टय़ा कठीण काम आहे. ‘इस्रो’ हळूहळू त्यात प्रावीण्य मिळवत आहे. यापूर्वी २००८ साली पीएसएलव्हीवरून एकाच वेळी १० उपग्रह सोडून ‘इस्रो’ ने विक्रम केला होता.
* ३ डीएमसी ३ (डीएमसी३-१, डीएमसी ३-२ आणि डीएमसी ३-३) हे प्रत्येकी ४४७ किलो वजनाचे होते. त्यांचा उपयोग पृथ्वीवरील पर्यावरणविषयक तसेच नागरी सुविधांची पाहणी करण्यासाठी होणार आहे.
* ९१ किलो वजनाचा सीएनबीटी-१ हा उपग्रह एसएसटील कंपनीने बनवलेला पृथ्वीच्या निरीक्षणासाठीचे तंत्रज्ञान सिद्ध करण्यासाठीचा सूक्ष्म उपग्रह आहे. सरे स्पेस सेंटरने बनवलेला डी-ऑर्बिटसेल नावाचा ७ किलो वजनाचा नॅनो म्हणजे सूक्ष्म उपग्रह आहे.
अशाच प्रक्षेपण तंत्रज्ञानाचा समांतर वापर संरक्षण क्षेत्रात करणे शक्य आहे. एकाच क्षेपणास्त्रावर एकापेक्षा अधिक बॉम्ब बसवून ते वेगवेगळ्या लक्ष्यांवर सोडता येतात. त्याला ‘मल्टिपल इंडिपेंडंटली टारगेटेबल रि-एन्ट्री व्हेइकल’ (एमआयआरव्ही) म्हणतात.

भारत अग्नी-६ क्षेपणास्त्रासाठी हे तंत्रज्ञान विकसित करत आहे. त्यावर एकाच वेळी ५ ते ६ बाँब बसवून वेगवेगळ्या लक्ष्यांवर मारा करण्याची सोय करण्याची योजना आहे. अमेरिका, रशिया यांच्याकडे एकाच क्षेपणास्त्रावरून १० वेगवेगळ्या ठिकाणी मारा करण्याची क्षमता आहे.