सोलापूर : संपूर्ण आयुष्य संस्कृत भाषेसाठी वेचलेले दिवंगत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांनी इस्लामच्या पवित्र कुराण ग्रंथाचा संस्कृत भाषेत भावानुवाद केला आहे. या ग्रंथाचा लोकार्पण सोहळा अक्कलकोटमध्ये येत्या २२ एप्रिल रोजी होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पं. बिराजदार यांनी संस्कृत भाषेत विविध १६ ग्रंथ लिहिले आहेत. तसेच इतर भाषांतील संस्कृत अनुवादाचे सात ग्रंथही त्यांच्या नावावर आहेत. जन्माने मुस्लीम असले तरी त्यांनी संस्कृत भाषा व साहित्य क्षेत्रात सुमारे सहा दशके केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे. तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले होते. याशिवाय तत्कालीन राष्ट्रपती के. नारायणन यांनीही त्यांना राष्ट्रीय पंडित पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले होते.

बिराजदार यांचे गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले होते. तत्पूर्वी, त्यांनी कुराण ग्रंथाचा संस्कृतमध्ये भावानुवाद हाती घेऊन पूर्ण केले होते. त्यासाठी त्यांनी देशभरातील काही विद्वान मौलाना, मुफ्तींशी चर्चा केली होती. पूर्ण केलेल्या संस्कृत कुराण ग्रंथाचा लोकार्पण सोहळा मुंबईत राजभवनावर करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु ग्रंथाचे मुद्रण व छपाई सुरू होण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र कवी बदिउज्जमा बिराजदार यांनी कर्तव्यभावनेने हे काम पूर्ण करून पितृऋण फेडण्याचा प्रयत्न केला आहे.

सोलापूरच्या शिवप्रज्ञा प्रकाशन संस्थेने ‘सरल-सुलभ-सुबोध : संस्कृत कुराण’ ग्रंथाच्या मुद्रण आणि छपाईची जबाबदारी पूर्ण केली आहे. हा ग्रंथ ९३६ पृष्ठांचा आहे. अक्कलकोटच्या बऱ्हाणपूर येथील हजरत ख्वाजा मखदूम अलावोद्दीन चिश्ती दर्गाहचे सज्जादे नशीन सय्यद शाह मुजाहिद साजीद हुसेन चिश्ती जहागीरदार यांच्या हस्ते या ग्रंथाचा लोकार्पण सोहळा रमजान महिना आणि पं. गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य साधून, २२ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता अक्कलकोट येथील हजरत ख्वाजा गुलाबसाहेब दग्र्यामध्ये आयोजिला आहे

वेगळे काय? कुराणाचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. परंतु संस्कृत भाषेत कुराणाचा भावानुवाद प्रथमच पं. गुलाम दस्तगीर बिराजदार यांनी केला आहे. अलिकडे देशात धार्मिक ध्रुवीकरण, जातीय तणाव वाढत असताना दुसरीकडे कुराण ग्रंथ संस्कृतमध्ये उपलब्ध होत आहे.

थोडी माहिती..

पं. गुलाम दस्तगीर बिराजदार हे मूळचे अक्कलकोट तालुक्यातील चिक्केहळ्ळी गावचे. त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संस्कृतचे शिक्षण घेतले होते. मुंबईच्या मराठा मंदिर संस्थेच्या शाळेत संस्कृत शिक्षक म्हणून त्यांनी प्रदीर्घकाळ सेवा केली होती. त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढीही संस्कृत भाषेच्या प्रेमात रमली आहे. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक विवाह सोहळय़ाच्या निमंत्रण पत्रिका संस्कृत भाषेतच छापल्या जातात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pt ghulam dastagir birajdar completed the translation of the holy quran into sanskrit zws