मान्सूनचे पहिले सत्र निराशाजनक गेल्याने ठिकठिकाणचे जलसिंचन प्रकल्प कोरडे पडले होते. पावसाअभावी दुष्काळाची भीती गडद होत चालली होती. मात्र, गेल्या १२ दिवसांत कोसळलेल्या दमदार पावसाने दुष्काळाची छाया निवळली असून, गेल्या आठवडय़ात १७ टक्क्यांवर असणारा विविध प्रकल्पांचा पाणीसाठा जवळपास तिपटीहून जादा झाला आहे. या कालावधीत कोसळलेल्या पावसाने खरीप हंगामाला दिलासा मिळाला आहे. तर, गेल्या ३६ तासांतील संततधार पावसाने कृष्णा, कोयना नद्या दुथडी वाहू लागल्या असून, पाटणनजीकचा संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेल्याने ३५ गावे संपर्कहीन बनली आहेत.
थोडीशी उसंत घेऊन धो धो कोसळणाऱ्या सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत राहताना, महामार्गावरील वाहतूकही संथगतीने सुरू होती. तर, दुष्काळी माण, खटाव, खंडाळा व फलटण तालुक्यांतही कमीअधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे.
प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठा, कंसात गतवर्षीची आकडेवारी- धोम ४.४८ (८.९८) टीएसमी, कण्हेर ५ (७.७७), वारणा २१.१३ (२९.२४), राधानगरी ५.८१ (७.८०), दूधगंगा १०.७५(२०.३०), उरमोडी ५.७५(७.७६) व धोम बलकवडी १.७२ (३.४३), तारळी ५.१४ (५.०२) टीएमसी.
सलग १२ दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामाला दिलासा मिळाला आहे. १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या महाकाय कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही या पावसाचा जोर राहिल्याने धरणाच्या पाणीसाठय़ात चांगलीच वाढ झाली आहे. आज सायंकाळी ६ वाजता कोयना जलाशयाची पाणीपातळी २,०८८ फूट राहताना, पाणीसाठा ३६.४७ म्हणजेच ३४.६५ टक्के आहे. गतवर्षी हाच पाणीसाठा ८६.७८ टीएमसी म्हणजेच ८२.४५ टक्के नोंदला गेला आहे. गेल्या ३६ तासांत कोयनेच्या पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर विभागात १७० एकूण १,८९१ मि.मी. नवजा विभागात २०९ एकूण २,१२७ मि. मी. तर महाबळेश्वर विभागात २५४ एकूण १६७८ मि. मी. पावसाची नोंद आहे. हा सरासरी पाऊस १८९८.६६ मि. मी. असून, गतवर्षी आजअखेर ३,३२४ मि. मी. पावसाची नोंद झाली होती. आजअखेरच्या सरासरीत कराड तालुक्यात १७३.२१ तर, पाटण तालुक्यात ६०७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी हाच पाऊस अनुक्रमे २९३.८० आणि १.०५७ मि.मी. नोंदला गेला आहे.
सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस असा सातारा ५९.३ एकूण २५२ मि.मी., जावळी ७० एकूण ४७५, कोरेगाव १४ एकूण ८४.४, फलटण १ एकूण ४३, माण ०.९ एकूण ७६.४, खटाव १२.९ एकूण ११०.६, वाई २३.७ एकूण १०८.९, खंडाळा ५.७ एकूण ५५.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच आज दिवसभरात पश्चिम महाराष्ट्राच्या धरण पाणलोटातील धोम प्रकल्पक्षेत्रात १७, कण्हेर १३, वारणा ५९, राधानगरी ५९, दूधगंगा प्रकल्पक्षेत्रात ३० मि.मी. पाऊस नोंदला गेला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा