‘लोकसत्ता’ आणि ‘झी २४ तास’ चा उपक्रम
महापालिकेची सत्ता हातात येऊन सहा महिन्याहून अधिक कालावधी लोटला असला तरी मनसेच्या स्थानिक नेत्यांसह पक्षश्रेष्ठींची असलेली निष्क्रीयता, उड्डाणपुलामागील राजकारण, मोकाट कुत्री व डासांमुळे होणारा त्रास, पाण्याची कृत्रिम टंचाई, प्रशासन व सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असलेली टोलवाटोलवी, आदीं विषयांवर नाशिककरांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना धारेवर धरले. निमित्त होते ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक असलेल्या आणि ‘झी चोवीस तास’ च्या वतीने आयोजित ‘आपलं शहर आपला आवाज’ या कार्यक्रमाचे.
शहरातील हुतात्मा स्मारकात रंगलेल्या या कार्यक्रमात महापौर अ‍ॅड. यतीन वाघ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कोशिरे, शिवसेनेचे नगरसेवक शिवाजी सहाणे, कॉग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. आकाश छाजेड, माकपचे तानाजी जायभावे, यांनी सहभाग घेतला. महापालिकेची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसून लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही. सत्ताधारी वचक ठेवण्यात अपयशी ठरले असून अनेक विकास कामे थांबविण्यात आली आहेत. महापौर व आयुक्त निर्णायक भूमिका घेण्यात कमी पडत असल्याचा आरोप यावेळी सहभागी वक्त्यांनी केला. महापालिकेच्या हाती सत्ता येऊन सहा महिन्यापेक्षा अधिक काळ लोटूनही मनसेच्या वतीने अद्याप कुठलाही ठोस कार्यक्रम वा उपक्रम राबविण्यात आलेला नाही. पक्षश्रेष्ठींची ‘ब्लूप्रिंट’ हरवली का, असा खोचक सवालही उपस्थितांनी विचारला. उपस्थितांच्या प्रश्नांच्या सरबत्तीपुढे महापौरांची बचाव करताना तारांबळ उडाली. सत्ता हातात आल्यानंतर दोन निवडणुकांमुळे आचारसंहिता लागु होती. त्यामुळे विशेष निर्णय घेण्यात आले नाही. यानंतर स्थायी समितीने अंदाजपत्रक मंजूर केल्यानंतर आगामी सिंहस्थ मेळाव्याच्या पाश्र्वभूमीवर शहर विकासाच्या दृष्टीने ठोस उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
सध्या शहर परिसरात स्वाइन फ्लू, डेंग्यू या आजारांसह मोकाट कुत्र्यांच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासन अजूनही सूस्त असून कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई न झाल्याने नाहक बळी जात आहेत, असा आरोप उपस्थितांनी केला. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा ठेका रद्द झाल्याने मोकाट कुत्र्यांचा प्रश्न उद्भवला आहे. याआधी अनेक कामे महापालिकेने खासगीकरणातून केल्यामुळे घोटाळे व भ्रष्टाचार झाले. यामुळे सध्या हे काम थांबविण्यात आले. आता लवकरच याबाबत कारवाई करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. गोदा पार्कची असणारी बिकट अवस्था, गोदेचे प्रदुषण, याबाबतही ठोस कारवाई होणार आहे. याबाबतचे राजकारण सर्वश्रृत असल्याचे सांगत महापौरांनी अधिक बोलणे टाळले.
शहराला भेडसावणारी पाणी टंचाई कुत्रिम असून आपल्याकडे मुबलक प्रमाणात पाणी साठा शिल्लक आहे. केवळ प्रशासनाच्या वतीने योग्य पध्दतीने नियोजन होणे आवश्यक असल्याचे गुरूमित बग्गा यांनी सांगितले. उड्डाणपुल केवळ मंत्र्यांच्या मर्जीसाठी चार ठिकाणी खाली उतरविण्यात आल्याचा आरोप उपस्थितांनी केला. याबाबत केवळ तांत्रिक अडचणीमुळे उड्डाणपूल चार ठिकाणी उतरवावा लागल्याचे बग्गा व कोशिरे यांनी सांगितले. आगामी वर्षांसाठी मनसेच्या वतीने गोदा प्रदुषण मुक्त करणे, नाशिककरांना रिंग रोड खुले करून देणे, कायमस्वरूपी विकासकामे करण्याचे नियोजन असल्याचे महापौरांनी सांगितले. सहाणे यांनी सत्ताधाऱ्यांना चांगल्या कामासाठी सेनेचा कायम पाठिंबा राहिल.
मात्र समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. छाजेड यांनी कुंभमेळ्याचा निधीचे योग्य नियोजन होण्यासाठी प्राधिकरण नियुक्तीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. जायभावे यांनी फाळके स्मारक राष्ट्रीय स्मारक व्हावे होण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. बग्गा यांनी स्वच्छ पाणी, खड्डे विरहीत रस्ते व स्वच्छ शहर या त्रिसूत्रीवर आपण काम करणार असल्याचे सांगितले.

Story img Loader