अहिल्यानगर : नेवासा शहरातील बाजारपेठेत सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपंचायतीकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. अनेक दुकानदारांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पूनर्वसनाचे धोरण न घेता सुरू केलेल्या या मोहिमेच्या विरोधात नेवासा व्यापारी संघटनेने आज, गुरुवारपासून बंद पुकारला आहे.
तीर्थक्षेत्र असलेल्या नेवासा शहरातील बाजारपेठेपेक्षा नेवासा फाटा- श्रीरामपूर रस्त्यावर अधिक दुकाने आहेत. या मोहिमेमुळे सुमारे ९६५ दुकाने बंद होणार आहेत. ज्याचा थेट फटका सुमारे ३५०० व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना बसणार आहे. गावाची बाजारपेठ पूर्ण उध्वस्त होणार असल्याचा व्यापारी संघटनेचा दावा आहे. प्रशासनाच्या मदतीसाठी अनेक व्यापारी स्वतःहून दुकाने खाली करत आहेत. यामुळे नेवासा शहरातील नागरिकांना खरेदीसाठी दुसऱ्या गावात अथवा अहिल्यानगरला धाव घ्यावी लागत आहे.
नेवासा बाजारपेठ विस्थापित होत असताना पुनर्वसनाचा अराखडा प्रशासनाकडे नाही, केवळ प्रशासनाला शहर उध्वस्त करायचे आहे का असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे. विजयाएकादशीला नेवासा शहरात मोठ्या संख्येने भाविक संत ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनासाठी आले, मात्र या भाविकांना शहरात नाष्टा, चहा मिळणे दुरापास्त झाले.परिणामी याविरोधात व्यापारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांनी आजपासून शहरात बेमुदत बंद आंदोलन सुरू केले. या मोहिमेत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे.