सावंतवाडी : मालवण राजकोट किल्ल्यावर नव्याने शिवपुतळा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून २० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली यांनी ही निविदा प्रक्रिया केली आहे.
राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला शिव पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळल्यानंतर शिवप्रेमींच्या तीव्र भावना उमटल्या. राज्य शासनाने राजकोट किल्ला येथे शिवछत्रपती महाराज पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केलेली आहे. यासाठी सुमारे २० कोटी अंदाजे खर्च गृहीत धरण्यात आला आहे. काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ६० फुटांचा असणार आहे.
हेही वाचा – Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला? आता सीआयडी करणार तपास!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नौदल दिनानिमित्त २८ फुटांचा भव्य पुतळा राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने अनावरण करण्यात आले होते. मात्र सोमवार दि. २६ ऑगस्ट २०२४ ला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला. अवघ्या ८ महिने २२ दिवसांत शिवरायांचा हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले.
या दरम्यान अनेक मान्यवरांनी राजकोट किल्ल्यावर भेट देऊन पाहणी करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंता यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये पुतळा शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ चेतन पाटील यांना अटकही झाली.