कर्जत : ब्रिक्स वर्ल्ड ऑफ ट्रॅडिशन मास्को-रशिया आणि लीड कॉलेज म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय कर्जत, महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी-पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय,औंध-पुणे आणि स्नेहवर्धन संशोधन संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आधुनिक भारताच्या जडणघडणीत देश आणि विदेशातील व्यक्तिमत्त्वांचे योगदान’ या विषयावरील २९ वी आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेचे आयोजन पिंपरी पुणे येथील महात्मा फुले महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते.

आधुनिक भारताच्या जडणघडणीत देश आणि विदेशातील महात्मा फुले ते सुधा मूर्ती यांचेपर्यंतच्या थोर व्यक्तिमत्त्वांचे असलेले योगदान तसेच मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा यानिमित्ताने या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले होते.

रशिया येथील लुधमिला सेकाचेव्हा यांनी या आंतराराष्ट्रीय कार्यशाळेत उद्घाटकीय मनोगत व्यक्त केले. लुधमिला सेकाचेव्हा यांनी ब्रिक्सची संशोधनविषयक भूमिका विशद केली. भारतीय तत्त्वज्ञान ते इंदिरा गांधीपर्यंतच्या व्यक्तिमत्त्वांनी भारताला दिलेला नवा आयाम त्यांनी उदघाटकीय मनोगतातून व्यक्त केला.

याप्रसंगी भारतातील रशियन ॲम्बेसीचे विक्टोर गोरेलॅक यांनी भारत आणि रशियाचे नाते आणि भारताच्या जडणघडणीमध्ये या ॲम्बेसीचे योगदान याविषयी मनोगत व्यक्त केले.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त जनरल मॅनेजर जी. बी सोनगावकर यांनी टांझानियामध्ये भारतीय संस्कृतीचा विकास कशाप्रकारे केला जात आहे, भारतीय संस्कृती इतर देशासमोर आदर्शवत कशी आहे याबाबत मत मांडले. भारतीय संस्कृतीचा अंगिकार करावा असा मनोदयही व्यक्त केला.

मॉरिशस येथील सेवानिवृत्त विभागीय विकास अधिकारी विश्वजीत कुंजुल यांनी मॉरिशसमध्ये भारतीयांनी उभारलेले विश्व आणि या विश्वामध्ये रमलेले भारतीय याविषयी सविस्तर माहिती सांगितली. महात्मा गांधी इन्स्टीट्यूट, मॉरिशस येथील मराठी विभागप्रमुख डॉ. मधुमती कुंजुल यांनी मॉरिशसमध्ये मराठी सण, उत्सव व परंपरा कशाप्रकारे जतन केली जात आहे हे विशद केले.

स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टीट्यूटच्या प्रमुख डॉ. स्नेहल तावरे यांनी आजपर्यंत आयोजित केलेल्या २९ आंतरराष्ट्रीय परिषदेचा आढावा घेतला. या परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून संदीप साकोरे यांनी महात्मा गांधी व कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षण पद्धतीचे आधारस्तंभ आहेत. शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीमध्ये या व्यक्तींचे महत्त्वाचे योगदान आहे. शिक्षणाचा पाया या व्यक्तींच्या कार्यावर उभा असल्याचे गौरवपर उद्गार व्यक्त केले.

या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोपीय सत्राचे अध्यक्ष व दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी जगातील विविध देशाला जोडणारा दुवा म्हणून महात्मा गांधींनी काम केले आहे. ते शांतीचे दूत असल्याचे त्यांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केले.

आंतरराष्ट्रीय कार्यशाळेला सहभागी झालेल्या विविध विषयांच्या संशोधकांनी आपल्या शोधनिबंधांचे सादरीकरण केले. या परिषदेत एकूण ४५ पुस्तके प्रकाशित झाली. ज्याची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेतली जाणार आहे. या पुस्तकांमधील सर्वाधिक १७ पुस्तके दादा पाटील महाविद्यालयाची प्रकाशित झाली. यामध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणिशास्त्र, भूगोल, गणित, बीसीए, वनस्पतीशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स, वाणिज्य, जिमखाना, ग्रंथालय, हिंदी, मराठी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र व इतिहास अशा सतरा विभागांच्या पुस्तकांचा समावेश आहे.

या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे प्रास्ताविक महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरीचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी केले. या सत्राचे आभार दादा पाटील महाविद्यालयाचे आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. संदीप पै यांनी मानले. हे चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी दादा पाटील महाविद्यालय कर्जत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध पुणे व महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी पुणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Story img Loader