समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सला अपघातानंतर ‘पीयूसी’ प्रमाणपत्र देणाऱ्या पीयूसी केंद्राचा परवाना अखेर रद्द करण्यात आला. ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल घेत यवतमाळ ‘आरटीओ’ने ही कारवाई केली.येथील उप प्रादेशिक परिवहन विभागाने आज, बुधवारी ही कारवाई केली. समृद्धी महामार्गावर ३० जून रोजी अपघात झाल्यानंतर २५ बळी घेणाऱ्या ट्रॅव्हल्सचे १ जुलै रोजी ‘पीयूसी’ प्रमाणपत्र काढण्यात आले. ही बाब तपासात समोर आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत ट्रॅव्हल्स मालकासह पीयूसी केंद्र चालकाला नोटीस बजावण्यात आली होती.
हेही वाचा >>> गडचिरोली : नक्षल्यांच्या नोटा बदलून देणारे दोघे अटकेत; २७ लाख जप्त
आज या दोघांनाही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जबाब देण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. मात्र, केंद्र चालकाने त्याकडे पाठ फिरविली. त्यामुळे कोणतीही पडताळणी न करता विदर्भ ट्रॅव्हल्स (क्र.एमएच २९, बीई-१८१९) ला पीयूसी प्रमाणपत्र देणाऱ्या यवतमाळातील रॉयल पीयूसी सेंटरचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ही ट्रॅव्हल्स प्रगती भास्कर दरणे यांच्या नावावर आहे. पीयूसी प्रमाणपत्राची मुदत मार्च महिन्यात संपली होती.
हेही वाचा >>> नागपूर : बंदोबस्तातील पोलीस कर्मचाऱ्यांना निकृष्ट नाष्टा
३० जूनच्या मध्यरात्री अपघात झाल्यावर १ जुलैला सकाळी साडेदहा वाजता दरम्यान यवतमाळातील रॉयल पीयूसी सेंटरमधून काढण्यात आल्याची बाब उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तपासणीत समोर आली. त्यामुळे अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स यवतमाळात पीयूसी काढण्यासाठी आलीच कशी, असा प्रश्न निर्माण झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत ट्रॅव्हल्स मालक व पीयूसी केंद्र चालकास नोटीस बजावण्यात आली होती. दोघांनाही जबाब नोंदविण्यासाठी बुधवारी पाचारण करण्यात आले. यावेळी पत्नी आजारी असल्याचे कारण देत भास्कर दरणे स्वत: उपप्रादेशिक कार्यालयात आले. तर, पीयूसी सेंटर चालकाने दांडी मारली. जबाब नोंदविण्यासाठी दोघांनाही बोलावण्यात आले होते. त्यापैकी एकानेच हजेरी लावली. दरणे यांचा जबाब नोंदविण्यात आला असून, अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येईल. पीयूसी सेंटरचा परवाना रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली.