मुंबई: वाहनांची वायुप्रदूषण तपासणी करून वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पोल्युशन टेस्ट सर्टिफिकेट-पीयूसी) मिळवणे आता महागात होणार आहे.
पीयूसी चाचणीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन विभागाने दिली. दुचाकी पीयूसी चाचणीच्या दरात १५ रुपये आणि चारचाकी वाहनाच्या दरात ३५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ तात्काळ लागू आहे. वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या धुरांमधून विषारी वायू बाहेर पडत असतात. त्यामुळे वायुप्रदूषणात भर पडते. वायूच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी (पोल्युशन टेस्ट सर्टिफिकेट-पीयूसी) करणे बंधनकारक केले आहे. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर पीयूसीची मुदत एक वर्षांपर्यंत असते. त्यानंतर दर सहा महिन्यांनी हे प्रमाणपत्र काढणे बंधनकारक असते. सध्या दुचाकी वाहन तपासणी किंवा चाचणीसाठी ३५ रुपये दर असून त्यात वाढ केल्याने हाच दर ५० रुपये झाला आहे. पेट्रोलवरील तीनचाकी वाहनाचाही दर ७० रुपयांवरून १०० रुपये, पेट्रोल, सीएनजी, एलपीजी वर चालणारे चारचाकी वाहने ९० रुपयांवरून १२५ रुपये आणि डिझेलवरील चालणाऱ्या वाहन चाचणीचा दर ११० रुपयांवरून १५० रुपये करण्यात आला आहे. हे दर तात्काळ लागू करण्यात आले आहेत.