Pulwama Terror attack: जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यात बुलढाण्यातील दोन जवान शहीद झाले आहेत. नितीन राठोड आणि संजय राजपूत अशी या जवानांची नावे असून या दोघांच्या गावात शोककळा पसरली आहे.
तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्यात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३९ जवान शहीद झाले. आदिल दार असे आत्मघातकी हल्ला चढविणाऱ्या अतिरेक्याचे नाव आहे. तो दक्षिण काश्मीरमधील काकेपुराचा आहे. २०१८मध्ये तो जैश ए मोहम्मदमध्ये सामील झाला होता.
या हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील नितीन राठोड हे शहीद झाले आहेत. लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गावातील नितीन राठोड या हल्ल्यात शहीद झाले आहे. या गावात नितीन राठोड नावाची दोन व्यक्ती असून दोघेही सीआरपीएफमध्येच कार्यरत आहेत. त्यामुळे गावात संभ्रमाचे वातावरण आहे. तर संजय राजपूत यांच्या भावांना याची माहिती मिळाली असली तरी आई आणि पत्नीला यासंदर्भातील माहिती देण्यात आलेली नाही, असे सूत्रांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने या दोन जवानांसंदर्भात अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.