गरिबांना अल्पदरात जेवण देण्याच्या उद्देशाने आज, रविवार प्रजासत्ताक दिनापासूनपासून (२६ जानेवारी) पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मिळून ११ ठिकाणी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता पुणे महानगरपालिकेतील उपाहारगृहात उद्घाटन कार्यक्रम पार पडला. पुण्यात सात आणि पिंपरी चिंचवडमध्ये चार ठिकाणी शिवभोजन थाळी मिळणार आहे.

राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यास गरिबांना दहा रुपयांत जेवण उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या टप्प्यात ११ ठिकाणी ही योजना कार्यान्वित करण्यात आले. तयार स्वयंपाकगृह आणि २५ माणसे एकाचवेळी जेऊ शकतील, अशी व्यवस्था असणाऱ्यांना या योजनेचा ठेका देण्यात आला आहे. आगामी काळात बचतगट, खाणावळी, भोजनालये येथे ही योजना सुरू करण्यात येईल.


या योजनेअंतर्गत जेवण घेणाऱ्याचे छायाचित्र, नाव आणि मोबाइल क्रमांक घेण्यात येणार आहे. त्यासाठी चालकाला शासनाकडून ‘महा अन्नपूर्णा ’ हे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रात रोज किमान ७५ आणि कमाल १५० जणांनाच या योजनेअंतर्गत जेवण देण्यात येईल. रोज दुपारी बारा ते दोन या वेळेतच ही योजना कार्यान्वित राहणार असून एका व्यक्तीला एकच थाळी मिळणार आहे.

केंद्रचालकांना शासनाकडून प्रत्येक थाळीमागे ४० रुपये अनुदान मिळणार असून दहा रुपये ग्राहकाकडून मिळणार आहेत. या योजनेसाठी पुणे शहर अन्नधान्य पुरवठा विभागाला ५४ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे, अशी माहिती शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी अस्मिता मोरे यांनी शुक्रवारी दिली. हे अनुदान पुरवठा विभागाकडून चालकाच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

Story img Loader