कराड : पुणे-बंगळूरू महामार्गावरून प्रवास करताना, कराड आले म्हटले, की वाहनचालक आणि प्रवाशांचे प्रचंड हाल अजूनही नक्की आहेत. अशातच येथील भव्य स्वरूपाच्या उड्डाणपुलाचे काम रखडल्याने वाहतूककोंडीचा त्रास आणि रखरखत्या उन्हाने वाहनचालक आणि प्रवासी पुरते हैराण झाले आहेत.
कराड शहरच्या प्रवेशद्वारावरील कोल्हापूर नाक्यावरून जाणाऱ्या सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराच्या भव्य पुलाचे काम रखडल्याने ऐन तळपत्या उन्हात सतत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
कराड व मलकापूर शहरातून जाणाऱ्या या उड्डाणपुलासाठी एकंदर ९२ खांबांवर १ हजार २२३ सिमेंटचे भाग (सेगमेंट) बसवायचे आहेत. त्यातील ८३ खांबांवर १ हजार १०१ सिमेंटचे भाग बसवले गेले असून, आजमितीला वाहतूककोंडीचे प्रमुख कारण बनून राहिलेला हा उड्डाणपूल बऱ्यापैकी तयार आहे. सध्या मलकापूरच्या शिवछावा चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाला जात आहे.
कराडच्या कोल्हापूर नाका येथे उड्डाणपुलाच्या कामात सव्वा महिन्यापूर्वी ३२ टन वजनाचा सिमेंटचा मोठा भाग (सेगमेंट) बसवताना क्रेनच्या तांत्रिक बिघाडामुळे तो कोसळून दुर्घटना घडली होती. त्याला महिना उलटूनही कोल्हापूर नाका येथील उड्डाणपुलाचे काम ठप्पच आहे. त्यामुळे या पुलाचे काम वेळेत पूर्ण होणे अशक्य असल्याचे दिसत आहे.
सध्या महामार्गाच्या सहापदरीकरणात कराड आणि मलकापूर शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मलकापुरात तीन किलोमीटरच्या अंतरात एक खांबी (सिंगल पिलर) उड्डाणपूल उभारला जात आहे. उड्डाणपुलाच्या सुमारे ८३ खांबांवर सिमेंटचे भाग (सेगमेंट) बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. कोल्हापूर नाका येथील खांब (पिलर) क्रमांक ८५ व खांब क्रमांक ८६ यावर १५ मार्च २०२५ रोजी सिमेंटचा भाग (सेगमेंट) बसवण्याचे काम सुरू होते.
पुलाला येथे वळण असल्यामुळे हे काम कौशल्याचे होते. असे असताना ३२ टन वजनाचा सिमेंटचा मोठा भाग (सेगमेंट) अचानक कोसळला. त्यात दोन कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर कोसळलेला सिमेंटचा भाग आणि अशा १४ सिमेंटच्या भागाची गुणवत्ता तपासणी होत आहे. सिमेंटचा भाग कोसळण्याच्या या घटनेला महिना उलटूनही कोल्हापूर नाका येथील उड्डाणपुलाचे ‘जैसे थे’ असल्याने वाहतूककोंडीत भर पडून लोकांचे प्रचंड हाल होत आहेत.
काम वेळेत पूर्ण होणे अवघड
महामार्गाच्या सहापदरीकरण कामाचे ठेकेदार डी. पी. जैन कंपनीचे व्यवस्थापन सांभाळणारे अधिकारी सौरभ घोष ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले, ‘कोल्हापूर नाक्यावर अचानक कोसळलेले सेगमेंट, अलीकडेच तुफान कोसळलेला अवकाळी पाऊस आणि सध्याचे प्रचंड ऊन पाहता उड्डाणपुलाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होणे अवघड आहे. हे एकूणच काम गतीने होऊन हा संपूर्ण उड्डाणपूल, त्याखालील मार्ग वाहतुकीस खुले व्हावेत, असा आमचा कसोशीने प्रयत्न राहणार आहे.